वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला पहाटे अचानक आग. खते व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी; सुमारे हजारो रुपयांचे नुकसान.
वेंगुर्ला.
वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला आज रविवारी पहाटे ४.३० वाजता वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान जागरूक नागरिकांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला.नंतर वेंगुर्ला नगरपरिषदचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आज पहाटे ४.३० च्या दरम्याने वेंगुर्ला खरेदी विक्री संघात जिथे खत विक्री होते त्या ठिकाणी अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणाऱ्या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबीयांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली.
तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमीत नाईक, कुणाल नाईक. प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडुन पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे ५.३० पर्यंत आग पूर्णतः विझवण्यात यश आले.