‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्याकडून वेंगुर्ला तालुक्यातील विकासकामांचा आढावा.....डिसेंबर २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करून १०० टक्के निधी खर्च करण्याचे सक्त निर्देश
सिंधुदुर्ग, दि. २८
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील वजराट अणसूर ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विविध विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.वजराट ग्रामपंचायतीच्या भेटीदरम्यान डॉ. बासूर यांनी एएसएसके केंद्राची पाहणी करून हे केंद्र ‘आदर्श केंद्र’ म्हणून विकसित करण्याबाबत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच ‘सेवा संकल्प अभियान’, ‘स्वच्छता ही सेवा’, जनसुविधा, पंधरावा वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), पीएम सूर्यघर योजना, जल जीवन मिशन, व्ही.बी. ग्राम-जी अंतर्गत जनहिताची कामे, महिला व बालविकास तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजना आणि १५ व्या वित्त आयोगाची सर्व कामे डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करून १०० टक्के निधी खर्च करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.येत्या काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई आणि कच्चे बंधारे बांधण्यासाठी जागा निश्चित करून याच आठवड्यात कामांना सुरुवात करण्याचे निर्देश डॉ. बासूर यांनी दिले. वजराट येथील मंदिर परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपस्थित सुमारे ५५ ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छतेविषयक साहित्याचे वाटप करण्यात आले.यानंतर अनसूर ग्रामपंचायतीला भेट देऊन डॉ. बासूर यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत अनसूर ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणीसाठी निवड झाली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मूल्यमापनाच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून योजनेतील तांत्रिक बाबी पूर्ण करून ती तातडीने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना पाणीपुरवठा उपअभियंत्यांना दिल्या.वेंगुर्ला पंचायत समितीला भेट देताना डॉ. बासूर यांनी सभापती शंकर घारे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तसेच तालुकास्तरीय विविध विभागांच्या प्रमुखांशी विकासकामांबाबत चर्चा केली. सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून सुरू असलेल्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.या दौऱ्यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, बांधकाम उपअभियंता सुहास टेमकर, पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, जलसंधारण उपअभियंता वसंत मोहिते, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्यासह वजराटच्या सरपंच पुराणिक, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण भोई, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
konkansamwad 
