अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार निलेश राणे यांनी मांडला अभ्यासपूर्ण मुद्दा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार निलेश राणे यांनी मांडला अभ्यासपूर्ण मुद्दा


 

मुंबई


 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देताना सिंधुनगरी येथील जिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकार गेले. त्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा फार मोठा परिणाम झाला. नव्याने निर्माण झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ना आवश्यक डॉक्टर, ना आवश्यक सुविधा! त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांचे फार मोठे नुकसान होत आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला. राज्याचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही वस्तुस्थिती मान्य करत आपण सिंधुदुर्गात स्वतः भेट देऊन पहाणी करू व हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील समस्यांसंदर्भात आज विधानसभेत स्थानिक आमदार निलेश राणे यांनी अभ्यासपूर्ण मुद्दा मांडला. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी भेडसावणाऱ्या अडचणी, आवश्यक पायाभूत सुविधा, व प्रशासकीय निर्णयांविषयी स्पष्टता यावर भर देत ठोस उपाययोजना सरकारने राबविण्यात याकडे त्यांनी लक्ष वेधले. खरे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी केंद्र सरकारकडून होते. ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिले जात नाही. मात्र सिंधुदुर्गात हे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे सर्व कामकाज बंद झाले आहे व त्याजागी वैद्यकीय महाविद्यालयाने ताबा घेतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक अडचणी व अनेक प्रश्न आहेत. प्रवेश घेतलेल्या गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे त्यांचेही नुकसान होत आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मंजुरीबाबत सारखेच निकष असताना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सरकार कसे चालवीत आहे याबाबतचे गांभीर्य घ्यावे याकडेही आमदार निलेश राणे यांनी अनेक उदाहरणे देत लक्ष वेधले आहेत.जिल्ह्यातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी अधिवेशन काळात केली. या मुद्द्द्यावर उत्तर देताना राजाचे आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही वस्तुस्थिती मान्य केली. आपण स्वतः सिंधुदुर्गात जाऊन, या सर्व रुग्णालयांची पाहणी करून आवश्यक त्या त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करेन," असे स्पष्ट आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.