विनापरवाना दगड वाहतूक करणारे २ डंपर जप्त; दोडामार्ग महसूल विभागाची धडक कारवाई

विनापरवाना दगड वाहतूक करणारे २ डंपर जप्त; दोडामार्ग महसूल विभागाची धडक कारवाई

 

दोडामार्ग

 

      दोडामार्ग तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत विनापरवाना दगडाची वाहतूक करणारे दोन डंपर जप्त केले आहेत. ही दोन्ही वाहने पुढील कारवाईसाठी दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.भेडशीचे मंडळ अधिकारी आणि भेडशी मंडळातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या विशेष वाहन तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान प्रकाश हनुमंतराव नागुरमेटी यांच्या ताब्यातील डंपर (क्र. GA 05 T 7661) आणि उमेश चंद्रकांत चव्हाण यांच्या ताब्यातील डंपर (क्र. GA 05 T 8105) यांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान पहिल्या डंपर चालकाचा eTP पास आणि दुसऱ्या डंपर चालकाचा CTP पास ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणीकृत (रजिस्टर) नसल्याचे उघडकीस आले. दोन्ही वाहनांमधून विनापरवाना दगडाची अनधिकृत वाहतूक होत असल्याचे सिद्ध झाल्याने मंडळ अधिकाऱ्यांनी तसा अहवाल सादर केला.तहसीलदार राहुल गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही डंपर चावीसह दोडामार्ग पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहेत. सध्या तहसील प्रशासनाकडून या दोन्ही वाहनांवर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.