वेंगुर्ल्यात ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट २०२६’ उत्साहात.....योग, व्यायाम, मनशांतीपासून स्वसंरक्षण व सायबर सुरक्षेपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन
वेंगुर्ले
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली असून, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य, सुरक्षितता आणि दैनंदिन जीवनातील सजगता यांचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट वेंगुर्ला २०२६’ उत्साहात पार पडला. वेंगुर्ला नगरपरिषद, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि वर्ल्ड पॉवर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नियमित व्यायाम, योगसाधना, शरीराची लवचिकता, दुखापत प्रतिबंध, मानसिक शांतता, हास्याचे महत्त्व, स्वसंरक्षण तसेच सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रणव वायगणकर, वर्ल्ड पॉवर इंडिया संस्थापक संतोष गावडे, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाचे प्रतिनिधी दादा साळगावकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई, डॉ. वसुधा मोरे फिटनेस अकॅडमीचे प्रतिनिधी रामा पोळजी, लीनेस क्लबच्या अध्यक्षा मृण्मयी केरकर, ॐ योग साधनेच्या साक्षी बोवलेकर, पतंजली वेंगुर्ला तालुका प्रभारी संजय तेरेखोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजू राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात साक्षी बोवलेकर यांनी योग आणि शरीराची लवचिकता याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची हालचाल सुलभ होण्यास मदत होते तसेच दैनंदिन जीवनात शरीराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले.सिद्धार्थ रेगे यांनी पुनर्वसन, दुखापत प्रतिबंध आणि फिटनेस व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. व्यायाम करताना शरीराची क्षमता, योग्य पद्धत आणि सातत्य यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दुखापत झाल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.सुषमा प्रभूखानोलकर यांनी भजनाच्या माध्यमातून मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शारीरिक आरोग्यासोबत मनाचे आरोग्य जपणेही तितकेच आवश्यक असल्याचा संदेश या सत्रातून देण्यात आला.संतोष गावडे यांनी हास्याचे महत्त्व सांगतानाच स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी राहण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या स्वसंरक्षणाच्या बाबींवरही त्यांनी माहिती दिली.सध्याच्या डिजिटल युगात वाढत असलेल्या ऑनलाइन व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर केशव नवाथे यांनी सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन केले. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव याबाबत नागरिकांनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.कार्यक्रमाला नगरसेवक रवींद्र शिरसाट, दत्तराज नर्सरीचे उमेश येरम, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. मिलिंद काळे, डॉ. सुरेखा काळे, डॉ. सोनाली सावंत, डॉ. दिपाली देसाई, डॉ. राखी माधव, लीनेस क्लबच्या हेमा गावस्कर इनर व्हील क्लब सेक्रेटरी श्रीया परब, आय एस ओ गौरी मराठे , मेंबर ॲड. अनुराधा वेर्णेकर आणि वंदना शितोळे तसेच चित्रा प्रभूखानोलकर , शैलेश जामदार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रगती चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील विविध संस्था, मार्गदर्शक आणि उपस्थितांचे आभार इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई यांनी मानले.
konkansamwad 
