नवरात्र नववा दिवस : सिद्धिदात्री स्वरूप

आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत नऊ दिवस युद्ध करून या सृष्टीला असुरांपासून मुक्त केले त्याचा आनंदउत्सव म्हणजेच नऊरात्री.आणि त्यातीलच हा नववा दिवस. 'सिद्धी' म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता. 'दात्री' म्हणजे देणारी किंवा प्रदान करणारी. नवरात्रीतील सिद्धीदात्री हे देवी दुर्गेचे नववे आणि अंतिम स्वरूप आहे, जे भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी आणि क्षमता प्रदान करते. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे. तिचे वाहन सिंह आहे.चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातांमध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होतात. असे मानले जाते की देवी सिद्धिदात्रीच्या घोर तपश्चर्येमुळे महादेवाला आठही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यांच्या शरीराचा अर्धा भाग देवीचा बनला, ज्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर असेही संबोधले जाते. नवरात्रीतील अखेरची माळ असल्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. दुर्गा देवीच्या या स्वरुपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होतो. देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषि-मुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धनाची प्राप्ती होते. शास्त्रानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी आहेत. या सर्व सिद्धी देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने मिळू शकतात. हनुमान चालिसामध्येही अष्टसिद्धीला नवनिधीचा दाता म्हटले आहे. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. तसेच नवरात्रीची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका पूजनाचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करून, नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता केली जाते. या दिवशी परिधान केला जाणारा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. हा रंग कुटुंबातील प्रेमळ संबंध आणि आपुलकी दर्शवतो. गुलाबी रंग सुसंवाद आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतो. या रंगाच्या वापराने घरात आणि संबंधांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते. गुलाबी रंग नम्रता, कोमलता आणि मृदुलतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग सौंदर्य आणि दयाळूपणा दर्शवतो.