आजी आजोबा दिवस...

लहानपण म्हटले की डोळ्यासमोर एक घरगुती चित्र उभे राहते, गच्चीवर बसलेले आजोबा एखाद्या जुन्या काळातील गोष्टी सांगत आहेत, तर स्वयंपाकघरातून येणाऱ्या फोडणीच्या सुवासात आजीच्या हातच गरमागरम पोळी-साखरेच जेवण. आई-वडिलांच्या शिस्तीखालची दुनिया कधी कधी कठोर वाटते, पण आजी-आजोबांच्या कुसमध्ये तोच दिवस मऊसूत गोधडीसारखा सुखदायी होतो. त्यांच्या मायेतील लाघवी हात म्हणजे आपल्यासाठी खरी शाळा, खरी संस्कारभूमी व खरेच जीवनमार्गदर्शक.आजी-आजोबांचे आयुष्य म्हणजे अनुभवांची मोठी खजिनाच. त्यांच्या अंगी असलेला संयम, संस्कारांचे बाळकडू आणि ममतेचा झरा हे आपल्याला सतत जीवनाचे नवनवे धडे देतात. ते आपल्याला शिकवतात की कठीण प्रसंगी कसे शांत राहायचे, कष्टातून आनंद कसा मिळवायचा आणि आयुष्याचा गोडवा साध्या-सोप्या जगण्यातच असतो हे कसे उमगवून घ्यायचे.आपण ज्या झाडाच्या सावलीत वाढतो, त्या झाडाला पाणी देणे हा आपला धर्म आहे. आजी-आजोबांच्या नात्याकडे पाहिले तर ते झाडासारखेच वाटतातमुळं घट्ट रोवलेली, पानगळ होऊनही नव्या उमलण्याची ताकद जपून ठेवलेली आणि आपल्या मुलांना, नातवंडांना जीवनदायी सावली देणारी.आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा आजी-आजोबांची उपेक्षा होते. ते घराच्या कोपऱ्यात एकटे पडतात. कधी मुलं परदेशात, तर कधी कामाच्या व्यापामुळे त्यांच्याशी बोलायलासुद्धा वेळ नसतो. पण त्यांच्यासाठी खरी भेट म्हणजे महागडी वस्तू नसून मुलांचे, नातवंडांचे सहवासाचे काही क्षण! एक प्रेमळ शब्द, एक हसरा चेहरा त्यांच्यासाठी अमूल्य ठरतो.आजी-आजोबा दिवस साजरा करण्यामागे खरी भावना हीच आहे त्यांच्या योगदानाची कदर करणे, त्यांचे आभार मानणे आणि त्यांच्यावर असलेल प्रेम व्यक्त करणे. शाळा, समाज आणि कुटुंब पातळीवर जर आपण हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला, तर पुढच्या पिढ्यांना आजी-आजोबांची महत्त्वाची भूमिका अधिक ठामपणे पटेल.ते केवळ भूतकाळाचे आधारस्तंभ नाहीत, तर भविष्यासाठीचे खरे मार्गदर्शक आहेत. त्यांची कहाणी आपल्या संस्कृतीचे वारस म्हणून पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आजी-आजोबा दिवस केवळ एका तारखेला मर्यादित न ठेवता, प्रत्येक दिवस त्यांच्या सहवासात ममतेने, कृतज्ञतेने आणि आनंदाने व्यतीत करायला शिकले पाहिजे.आजी-आजोबा म्हणजे घरच खऱ्या अर्थाने कष्ट, प्रेम आणि आशीर्वादाच सोन. त्याच महत्त्व ओळखून, त्याच सांभाळ करून आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांना पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊनच आपण त्यांच खर ऋण फेडू शकतो.