कणकवली येथे सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग
कणकवली
कणकवली तालुक्यातील पिसेकामते येथील गावठणवाडीमध्ये सुनील कृष्णा गुरव यांच्या घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही घटना आज १०.३० च्या सुमारास घडली.पिसेकामते गावठणवाडी येथे सुनील गुरव यांचे चिरेबंदी, वर पत्रे असलेले घर आहे. तर या घराला लागून मागील बाजूस कौले असलेली पडवी असून, या पडवीत जेवणघर आहे. आज सकाळी सुनील गुरव हे बुधवळे येथे मजुरीसाठी गेले होते. त्यांनी पत्नी शेतात भाजनावळण करण्यासाठी गेली होती. तर दोन मुली शिक्षणासाठी कणकवलीत गेल्या होत्या. सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास घरातील जेवणाच्या पडवीत ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर पडवीला आग लागून ती काही वेळातच घराच्या इतर भागात पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यात लगतच्या ओहोळात पंप लावून आगीवर नियंत्रण आणले. या घटनेत घरातील दागिने, कपडे, रोकड आणि इतर साहित्याचे मिळून नुकसान झाले आहे.

konkansamwad 
