तुळस येथे महिला नेतृत्व विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

वेंगुर्ला
ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्व गुणांना नवा आकार देण्यासाठी व सामाजिक-राजकीय सक्षमीकरणासाठी महिला नेतृत्व विकास कार्यशाळा तुळस येथे मोठ्या उत्साहात पार पडली. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि डॉन बॉस्को संचलित कोकण विकास संस्था, पणजी, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील देव जैतिरश्रीत संस्था, मुंबई यांच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. या शिबिरासाठी श्री देवी सातेरी महिला मंडळ तुळस यांचे ही सहकार्य लाभले.या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन तुळस सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक तोंडवली डी.एड. कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रगती विवेक चव्हाण, कोकण विकास संस्थेच्या रिजनल ऑफिसर साफिया सय्यद, समन्वयक राजेंद्र कांबळे, खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे प्रा. विवेक चव्हाण, सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्त्या प्रगती विवेक चव्हाण यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना ठाम शब्दांत सांगितले की “गाव, समाज व कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. महिला केवळ कुटुंबापुरत्या सीमित न राहता गावाच्या व समाजाच्या निर्णय प्रक्रियेत पुढे आल्या पाहिजेत. या शिबिरातून आत्मविश्वास वाढवून भावी महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक नेत्या घडविणे हा आमचा संकल्प आहे. गावोगाव महिला नेतृत्व फुलले तर खरी लोकशाही सक्षम होईल. महिलांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, विकास या क्षेत्रात ठोस भूमिका घेतली पाहिजे. महिलांचे नेतृत्व म्हणजे फक्त राजकारण नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे.”
तुळस, पाल, मठ, मातोंड आणि होडावडे या गावांतील महिलांचा या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग होता. गटचर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवकथन व खेळाच्या माध्यमातून महिलांना प्रत्यक्ष नेतृत्वाचे धडे देण्यात आले. उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, उत्साह आणि सकारात्मक बदलाची जिद्द स्पष्टपणे जाणवत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच रश्मी परब यांनी आपल्या भाषणात म्हटले की “गावाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान अपरिहार्य आहे. अशा कार्यशाळांमुळे महिलांना योग्य व्यासपीठ मिळते आणि त्यातून गावोगाव सक्षम महिला नेते घडतात.” साफिया सय्यद (कोकण विकास संस्था) यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व महिलांना सक्षमीकरणाची हमी दिली. राजेंद्र कांबळे व प्रा. विवेक चव्हाण यांनी नेतृत्वकौशल्य, निर्णयक्षमता व आत्मविश्वास यांचे महत्त्व विशद केले. सुजाता पडवळ यांनी महिलांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
या कार्यशाळेतून महिलांना आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सामाजिक भान व नेतृत्वगुण विकसित करण्याची नवी प्रेरणा मिळाली. गावोगाव महिला नेतृत्वाचा भक्कम पाया घालण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास सहभागी महिलांनी व्यक्त केला. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे महेश राऊळ, मंगेश सावंत, आबा राऊळ, मनोज आंगणे, हर्षवर्धन तांबोसकर, नाना सावळ, माधव तुळसकर, प्रदीप परुळकर, सचिन गावडे, विधी नाईक, सानिया वराडकर, भक्ती भणगे, निकिता कबरे, जान्हवी सावंत, प्रज्वल परुळकर, रोहित गडेकर आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सचिन परुळकर यांनी केले.