आंधळ्याच्या हातातील कंदील म्हणजे कविता!- प्रा. कवी अशोक बागवे 

आंधळ्याच्या हातातील कंदील म्हणजे कविता!- प्रा. कवी अशोक बागवे 

कल्याण

 


       "कविता ही आंधळ्याच्या हातातील कंदील होय! कविता ही वर्तमानात असते, जरी ती भूतकाळात रमत लिहिलेली असते. पसायदान केवळ संत ज्ञानेश्वर यांनी नाही मागितले तर प्रत्येक कवी हे मागणे मागतच असतो. आधुनिक कवितेतील केशवसुत यांच्यापासून ते दलीत कवितेतील कवी ते डॉ गिरीश लटके यांच्यापर्यंत ही परंपरा आली आहे." असे प्रा. कवी अशोक बागवे  आपल्या कवितेवरील व्याख्यानात उद्गारले. शाहू शिक्षण संस्था, (पं ) कल्याण शाखेअंतर्गत मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शाहू अध्यापक महाविद्यालय आणि देवजीभाई हरिया विधी महाविद्यालय, शहाड-कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने "काव्य जल्लोष... कवितेचा जागर!" हा एक दिवसीय काव्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक यांची काव्य मैफिल, खुली स्वरचित  काव्य मैफिल आणि काव्य सांज असे तीन सत्र मिळून मोठ्या उत्साहात हा काव्यमहोत्सव पार पडला. काव्य सांज सत्राअंतर्गत कवी अशोक बागवे आणि अरुण म्हात्रे यांचे कवितेवर व्याख्यान झाले. त्यात कवी डॉ. गिरीश लटके यांच्या "चराग जलाओ यारो" ह्या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन अरुण म्हात्रे यांच्या हस्ते ; तर "रुजवावे पसायदान ओठी" ह्या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. कवी अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. कवी अरुण म्हात्रे यांनी संग्रहातील 'शेला' कवितेला सुंदर चाल लावून ती छान गाऊन दाखवली, तेव्हा उपस्थितांनी उस्फुर्त दाद दिली.यासमयी आपल्या खुमासदार शैलीत बोलताना  प्रा.अशोक बागवे यांनी कविता म्हणजे काय याचे सुंदर विवेचन केले. मराठी भाषेचा इतिहास कथन करताना केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, सावरकर, पाडगावकर, नारायण सुर्वे ना. धो. महानोर, ग्रेस, नामदेव ढसाळ, आदि ख्यातनाम कवीच्या ओळी उद्यृक्त करून त्या त्या काळात कवितेतून त्यांनी पसायदान कसे मागितले गेले हे विस्ताराने सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  "आमच्या सारख्या कवीनीही कवितेतून पसायदान मागितले आहे. माझे पसायदान मी सांगणार नाही पण व्यासपीठावर उपस्थित असलेले अरुण म्हात्रे यांनीही आपल्या कवितेतून पसायदान सांगितले आहे " असे सांगून त्यांच्या कवितेतील ओळी उद्यृक्त केल्या तेव्हा उपस्थित रसिकजन भारावून गेले. तसेच डॉ गिरीश लटके यांनी "रुजवावे पसायदान ओठी " संग्रहातदेखिल 'संघर्षणम् शरणम् गच्छामी' कवितेत पसायदान मागितले आहे. आणि वाचकाला तेव्हा भगवान बुद्ध आठवतात. प्रज्ञा, शील आणि करुणा त्रिगुणांचे महत्त्व विषद केले. यावेळी अशी खंत व्यक्त केली की, "आपण शब्दांकडे नीट बघतच नाहीत. अर्थ समजून घेत नाही. कारण आपण इंग्रजाळलेलो आहोत. माणूस हा फार विचित्र असतो तो भूतकाळात काय झालं आणि भविष्यात काय होईल याचाच विचार करतो आणि वर्तमानात जगतच नाही. माणसाला वर्तमानात जगता आले पाहिजे. आणि डॉ. गिरीश लटके यांच्या कविता वर्तमान काळ जपणाऱ्या कविता आहेत!" असे प्रतिपादन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अभिनेते-कवी सुधाकर वसईकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य मैफिल रंगली. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध नामवंत कवींच्या कविता सादर करून साहित्यप्रेमाचा सुरेल आविष्कार घडविला. या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री प्रा. कल्पना सोमनाचे यांनी केले.दुसऱ्या सत्रात डॉ. चिंतामण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन आयोजित करण्यात आले. कल्याण, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड आणि आंबिवली परिसरातील कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून श्रोत्यांची मनं जिंकली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, मानवी मूल्ये आणि समकालीन वास्तव यांवर आधारित कवितांनी कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त करून दिली. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. के. डी. शिंदे यांनी केले.तिसऱ्या सत्रात कवी डॉ. गिरीश लटके यांच्या "चराग जलाओ यारो" आणि "रुजवावे पसायदान ओठी" या काव्यसंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि अरुण म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अभिनेते, समीक्षक सुधाकर वसईकर यांनी प्रस्तावनाकार म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी डॉ. लटके यांच्या साहित्यसेवेचा गौरव करत त्यांच्या काव्यलेखनातील सामाजिक जाणीव, मानवी मूल्यांची बांधिलकी आणि संवेदनशील अभिव्यक्तीचा विशेष उल्लेख केला. या सत्राचे सूत्रसंचालन सुधीर चित्ते यांनी केले.या साहित्यिक सोहळ्यात काव्य, विचार, अभिव्यक्ती आणि साहित्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरलेला हा काव्य आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.