प्रशिक्षणादरम्यान थरकाप उडवणारी दुर्घटना....हवेतच समोरासमोर धडकल्याने दोन हेलिकॉप्टर कोसळले!
अमेरिका
अमेरिकेत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघातात हवेतच दोन हेलिकॉप्टरची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या थरारक दुर्घटनेत एका प्रशिक्षणार्थीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमानतळाजवळ घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून एकच शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण प्रशिक्षक आणि एक शिकाऊ पायलट होते, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये एक अनुभवी पायलट एकटाच होता. हे दोन्ही हेलिकॉप्टर विमानतळाच्या नजीक असलेल्या एका शेतात कोसळले. या भीषण धडकेमुळे एक हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून दुसरे हेलिकॉप्टर उलट्या अवस्थेत पडले होते. अपघातानंतर घटनास्थळावर सर्वत्र ढिगारा पसरला होता. अपघाताचा आवाज इतका जोरदार होता की, परिसरातील नागरिक व प्रत्यक्षदर्शी प्रचंड आवाजाने हादरले. हवेतच दोन विमाने किंवा हेलिकॉप्टर एकमेकींवर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. सुरक्षेचा उपाय म्हणून यंत्रणेने तात्काळ नजीकचा महामार्ग बंद केला आणि नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले. या दुर्घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित सुरक्षा मंडळ आणि विमान वाहतूक प्रशासन कसून चौकशी करत आहेत. अपघातामध्ये सहभागी असलेल्या संबंधित हेलिकॉप्टर कंपनीनेही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या भीषण घटनेमुळे उड्डाण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
konkansamwad 
