सिंधुदुर्गात 'मृत्युंजय दूत' कार्यशाळा संपन्न....आपत्कालीन मदतीबद्दल महिलांचा विशेष सत्कार
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने नुकतीच 'मृत्युंजय दूत' या विषयावर एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अनेक 'मृत्युंजय दूत' मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्ते अपघातात तातडीने मदत कार्य करत अनेक निष्पापांचे प्राण वाचवणाऱ्या 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या रूपा मुड्राळे आणि हेलन निब्रे या दोन महिला 'मृत्युंजय दूत' यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. रस्त्यावरील अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 'गोल्डन अवर'मध्ये तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देणे अत्यंत गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांना तातडीने मदत कशी करावी, याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी उपस्थित 'मृत्युंजय दूत' तसेच जिल्ह्यातील वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस अंमलदारांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत डॉ. अमोल यांनी अपघाताप्रसंगी जखमींना प्रथमोपचार कसे द्यावेत आणि त्यांना सुरक्षितपणे वैद्यकीय केंद्रात कसे पोहोचवावे, याचे प्रात्यक्षिकांसह उपयुक्त प्रशिक्षण दिले. याशिवाय, वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनीही उपस्थित 'मृत्युंजय दूत' यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सनी मोरजकर, रवी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील 'मृत्युंजय दूत' मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
