भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये भगवा फडकला पाहिजे, आमदार निलेश राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका मध्ये भगवा फडकला पाहिजे, आमदार निलेश राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


कुडाळ 


          आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण जास्तीत जास्त सदस्य संख्येची नोंदणी करून त्यांना वाढदिवसाची भेट देऊ असे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी सांगून सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या. या नोंदणीवर भविष्यातील निवडणुका आपण जिंकू शकतो येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकला पाहिजे यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहनही त्यांनी कुडाळ येथे आयोजित सदस्य नोंदणी कार्यक्रमात केले.कुडाळ येथील लाईम लाईट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट आदी उपस्थित होते.यावेळी शिवसेनेची सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांना ओळखपत्र देण्यात आले. तसेच यावेळी लक्ष्मीवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शहरातील रिक्षा व्यवसायिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, शिवसेनेची संघटना ही तळागाळातील जन माणसांचे काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाते जो संघटनेसाठी वेळ देईल संघटनेचे काम करील त्याला भविष्यात पदे दिली जातील. असे सांगितले.
         यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आम्ही लहान असल्यापासून शिवसेनेत काम केले आहे. त्यावेळी सुद्धा जिवाभावाची माणसे जोडण्यावरच आमचा भर असायच तसाच भर आताही आम्ही देणार आहोत.संघटना वाढवताना जो मेहनत घेईल त्याचे कौतुक केले जाईल. संघटनेमध्ये ठेकेदारीसाठी येऊ नये. संघटना वाढीसाठी गांभीर्याने काम करणे महत्त्वाचे आहे. आपल्या बुथवर असलेल्या मतदारांची नोंदणी आणि त्यांच्या मधून सदस्य नोंदणी होणे गरजेचे आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघटनेवर जास्त भर देतात. त्यामुळे संघटना वाढीसाठी प्रत्येकाने मेहनत घेणे गरजेचे आहे. एकमेकांमध्ये भांडून संघटना कमी करण्यापेक्षा एकमेकांना जोडून संघटना वाढवण्यावर सर्वांनी भर द्यावा. माझी ओळख ही खासदार नारायण राणे यांच्यामुळे झाली पण ती ओळख वाढवण्याचे आणि टिकवण्याचे काम माझे आहे असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की शिवसैनिकापेक्षा दुसरे कुठेही मोठे पद नाही. पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपला भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या. जो सदस्य संख्या वाढवेल त्याचा विचार पुढील काळात केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन दादा साईल यांनी केले.