हवामान बदलाचा फटका.....आंबा-काजू बागांचे कीड व रोगांपासून रक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे आवाहन

हवामान बदलाचा फटका.....आंबा-काजू बागांचे कीड व रोगांपासून रक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे आवाहन

सिंधुदुर्ग

      जिल्ह्यात सध्या आंबा आणि काजू बागांमध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, ढगाळ वातावरण आणि काही भागांत झालेल्या पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंबा पिकावर तुडतुडे, करपा रोग आणि शेंडे पोखरणारी अळी, तर काजू पिकावर ढेकूण कीड आक्रमण करू शकते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यातर्फे शेतकऱ्यांना बागांची नियमित पाहणी करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजना राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पालवी येत असल्याने तुडतुडे रस शोषून नुकसान करू शकतात तसेच चिकटा पडून काळी बुरशी वाढू शकते, त्यामुळे प्रादुर्भाव दिसून आल्यास डेल्टाभेथ्रीन ९ मिली (तुडतुडे), थायोफिनेट मिथाईल १० ग्रॅम (करपा) किंवा टोलफेनपायरॅड २० मिली (शेंडे पोखरणारी अळी) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच फवारणीचे ड्राम प्रभावी ठरण्यासाठी स्टिकर व स्प्रेडरचा वापर करावा आणि आंब्याची पालवी सशक्त करण्यासाठी ०:०:५० व १३:०:४५ ही विरघळणारी खते प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून स्वतंत्रपणे द्यावीत. दुसरीकडे, काजूच्या वेंगुर्ला-१, ४, ७, ९ आणि १० या वाणांना पालवी फुटू लागली असून वेंगुर्ला-१० व १ वर काही ठिकाणी मोहरही दिसू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ढेकूण कीडीपासून संरक्षण करण्यासाठी लॅम्डा सायलॅलोथ्रीन ६ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे आणि पुढील १५ दिवसांत येणाऱ्या मोहराच्या वाढीसाठी व जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती जैविक आच्छादन करून शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करावी, असा सल्ला दिला आहे.