कुडाळ तालुक्यातील बांबर्डे-नारुर मार्ग धोक्यात, बांधकाम विभागाच्या कारभारावर संताप

कुडाळ तालुक्यातील बांबर्डे-नारुर मार्ग धोक्यात, बांधकाम विभागाच्या कारभारावर संताप

कुडाळ


      कुडाळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर या सुमारे १५ किलोमीटरच्या मुख्य मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून साईडपट्टीही खचल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असल्याने रस्त्याची समस्या कायम असून प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावरील वेताळ बांबर्डे तिठा ते पावणाई टेंब हा भाग पूर्णतः धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला असलेली साईडपट्टी खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी काँक्रीट ग्रिटचा वापर करून तात्पुरती डागडुजी केली होती; परंतु अवघ्या आठ दिवसांत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आणि ऐन गणेशोत्सवात नागरिकांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागला. आता पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या मार्गावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी, रस्त्याची झीज होऊन ठिकठिकाणी खड्डे पडतात. जोपर्यंत योग्य गटार व्यवस्था आणि पक्की दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. या मार्गावरून एसटी बस, ट्रक, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, साईडपट्टी खचल्यामुळे समोरून मोठे वाहन आल्यास दोन्ही वाहनांना एकाच वेळी मार्ग काढणे कठीण होते, ज्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.