वेंगुर्ले येथे वाळू शिल्पातून दिली मनमोहन सिंग यांना आदरांजली.

वेंगुर्ले येथे वाळू शिल्पातून दिली मनमोहन सिंग यांना आदरांजली.

 

वेंगुर्ला
   वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार संजू हुले यांनी नवाबाग बीच येथे माजी पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्कृष्ट असे वाळूशिल्प साकारले. वेंगुर्ले बंदर येथे नव्याने साकारलेले झुलता पूल येथे पर्यटकांची संख्या वाढत असून येथील वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिक, पर्यटकांनी गर्दी केली होती. आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजू हुले यांच्या या कलेचे पर्यटकांकडून कौतुक होत आहे. ते गेली 15 वर्षे विविध सण, नेत्यांची जयंती-पुण्यतिथी दिवशी, जत्रोत्सव दिनी, तालुक्यातील विविध देवतांची वाळूशिल्पे साकारत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी 25 हून अधिक वाळूशिल्पे साकारली आहेत. 
       तसेच गेल्या वर्षभरात त्यांनी येथून मिळणाऱ्या डोनेशनमधून शालेय गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या आदीचे वाटप करून सामाजिक कार्य जोपासले आहे. त्यांनी मागील कालावधीत रेडी द्विभुज गणपती, उभादांडा श्री गणपती, श्री मानसीश्वर, वेंगुर्ले श्री देवी सातेरी, कोल्हापूर श्री महालक्ष्मी, आरवली श्री वेतोबा, अयोध्या राममंदिर व रामलल्लाची प्रतिकृती, होडी प्रतिकृती, राष्ट्रपिता महात्मा गांधी, नाताळ सण, तानाजी मालूसरे, शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तसेच अन्य विविध प्रकारची वाळूशिल्पे साकारली आहेत. त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
   वेंगुर्ले बंदर भागात वाळूशिल्प साकारले जात असल्याने वेंगुर्लेतील पर्यटकांची संख्या वाढली आहे. आगामी कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने वाळूशिल्प साकारण्यासाठी त्यांना वाळू, पाणी व इतर सहकार्य करण्यात येणार आहे.