कुडाळ भाजपाचा तालुका मेळावा १२ फेब्रुवारीला

कुडाळ
भाजप कुडाळ तालुका मेळावा बुधवार दि. १२ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजता ओरोस भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा भव्यदिव्य असणार असून पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी दिली.सिंधुदुर्गनगरी येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ओरोस मंडळ महिला अध्यक्षा सुप्रिया वालावलकर आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना रणजित देसाई यांनी, देशातील नागरिकांनी आता हिंदुत्व आणि राष्ट्रीय आत्मीयता याला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी सत्ता दिली. सिंधुदुर्गात प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक होवून खासदार राणे विजयी झाले. त्यानंतर कोकणात झालेल्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही विधान परिषद निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून आले. डिसेंबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आले.त्यानंतर भाजप पक्षाने राबविलेल्या पक्ष सदस्य नोंदणीत ग्रामीण भागात सर्वाधिक नोंदणी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सत्कार केला.या सर्व यशानंतर आम्ही आता प्रत्येक तालुक्यात पक्षाचा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातून १२ फेब्रुवारीला होत आहे. याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून यानिमित्त भाजपची कुडाळ तालुक्यातील ताकद दाखविली जाणार असे सांगितले. प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला मंडळ अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, आरती पाटील गाववार भेटी घेवून तयारी करीत असल्याचेही यावेळी देसाई यांनी सांगितले. या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभत आहे. यानिमित्त भाजपात मोठ्या संख्येने विरोधी पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. आम्ही फक्त विरोधी पक्षातील चांगले चेहरे असलेल्या व्यक्तींना पक्षात प्रवेश देणार आहोत. मात्र, महायुतीतील कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणार नाही. भाजप पक्षच जिल्ह्यातील महायुतीचे नेतृत्व करीत असल्याने आम्ही सहकारी पक्षात फोडाफोडी करणार नाही. एप्रिल, मे महिन्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. आमच्या प्रमाणे महायुतीतील अन्य पक्षांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षातील काही पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेले तरी काही अपवाद वगळता आमच्या बूथ यंत्रणेत फरक पडलेला नाही, असे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.