कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल १६ तासानंतर पुर्ववत सुरू.

कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल १६ तासानंतर पुर्ववत सुरू.

रत्नागिरी.

  पेडणे येथील बोगद्यातील पाणी आणि ट्रॅक वर आलेली माती बाजूला करण्यात यश आलं आहे. त्यामुळे तब्बल १६ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे. पेडणे बोगद्यातून पहिली मालगाडी सोडून चाचणी घेण्यात आली. आणि कोकण रेल्वेची वाहतूक बोगद्यातून सुरळीत सुरू झाली. आता बोगद्यातून एकेक गाडी सोडली जाणार आहे.
  कोकण रेल्वेला पावसाचा फटका बसला आहे. काल मुसळधार पावसामुळे पेडणे बोगद्यात पाणी भरलं होतं.तसंच रेल्वे ट्रॅकवर आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या आता रद्द झाल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक शाळांना सुटीही जाहीर केली होती.
   गोवा येथील पेडणे बोगद्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. कोकण रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस, कोच्चिवली एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या. मुंबईवरून येणाऱ्या कोकणकन्या आणि तुतारी या गाड्या सावंतवाडी स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. कालपासून गोवा पेडणे बोगद्यात भूगर्भातून पाणी व माती रूळावर येत असल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली होती. मंगळवारी सायंकाळी बोगद्यात रूळावर पाणी आणि माती होती. त्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झाली. तब्बल १६ तासांपासून मजूर बोगद्यात साचलेलं पाणी आणि चिखल बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.