प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर जाण आणि भान असणे महत्वाचे : मिनाक्षी आळवणी. खर्डेकर महाविद्यालयात ‘प्रौढावस्थेच्या उंबरठ्यावर जाण आणि भान’ विषयी व्याख्यान संपन्न.
वेंगुर्ला.
येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने सावंतवाडी येथील सहज ट्रस्टच्या अध्यक्षा व मानोसोपचार तज्ञ मिनाक्षी आळवणी यांचे प्रौढावस्थेच्या उंबरठ्यावर जाण आणि भान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिनाक्षी आळवणी यांनी स्वतःला ओळखा, स्वतःला समजून घ्या असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विचार व भावनांचा समतोल तर सकारात्मक वर्तन घडते असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर कोणत्या वाटेवर आपण जातोय या जाणीवेचे भान असणेही गरजेचे आहे. तसेच कोणत्याही कार्यात स्वप्रेरणा, स्वऊर्जा महत्वाची ठरते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. बी.चौगले होते. यावेळी त्यांनी मन नावाच्या सहाव्या इंद्रियाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक व नकारात्मक परिणाम कसा होतो. याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून नकारात्मक विचारांवर मात करता येते असेही मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ मनिषा मुजुमदार यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. धनश्री पाटील यांनी करुन दिला. यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा. वामन गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़ाल्गुनी नार्वेकर हिने केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.