साहित्यिक वृंदा कांबळी यांचा 'अधुऱ्या कहाणीचा शेवट' पुस्तक प्रकाशित

साहित्यिक वृंदा कांबळी यांचा 'अधुऱ्या कहाणीचा शेवट' पुस्तक प्रकाशित

 

वेंगुर्ला
 

       सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध साहित्यिक सौ.वृंदा कांबळी यांचा 'अधुऱ्या कहाणीचा शेवट' या नावाचा कथासंग्रह वाचकांसाठी बाजारात उपलब्ध झाला असून कणकवलीच्या विघ्नेश पुस्तक भांडारने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. सौ. कांबळी यांचे हे तेरावे पुस्तक असून सहावा कथासंग्रह आहे.यापूर्वी ५ कथासंग्रह ५ कादंबऱ्या व २ ललित अशी साहित्य प्रसिद्ध आहे.
   'अधुऱ्या कहाणीचा शेवट' या पुस्तकातील कथालेखनात सौ. कांबळी यानी नवीन प्रयोग करून अतिशय नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण मांडणी केली आहे. कांबळी यांच्या कथांमधून नेहमीच भोवतालच्या समाजाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते त्यामुळे हा कथासंग्रह त्याला अपवाद नाही. सध्या स्मार्ट फोनसारखे अत्यंत प्रभावी साधन सामान्य माणसाच्या हाती येऊन सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन ढवळून निघताहेत, अनेक विचारांचे प्रवाह वाहत आहेत. अशावेळेस  माणसे या माध्यमातून जवळ आल्यासारखी वाटतात. त्यात माणसांचे भावविश्व ढवळून निघते. मानवी मनाच्या आत असलेले भावभावनांचे सूक्ष्मपण प्रभावी रसायन लेखिकेने कथांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच मानवी मनावर परिणाम करणारे भावनिक कंगोरे उलगडून दाखवले आहेत. माणसाच्या मनात रूतलेले एकाकीपण. त्यासाठी माणसांनी शोधलेल्या वाटा, त्या वाटांनी वाटचाल करण्यातील संघर्ष हे सर्व दाखवले आहे. यातील कथा या प्रेमकथा आहेत. तरी तारूण्यातील प्रेम व विरक्तीच्या उंबरठ्यावरील प्रेम यात फरक आहे. आताचे आकर्षण हे एका भावनिक गरजेतून निर्माण झालेले असते. मग ती एकाकीपणाची भावना असेल किंवा आधाराची गरज असेल.वृद्धापकाळात मनावर चढणारी नैराश्याची गूढ सावली पुसून टाकण्याचाही तो प्रयत्न असेल.ती अनामिक पण अदृष्य ओढ दोघेही कशी निभावतात, त्याचे परिणाम काय होतात हे कथांमधूनच वाचावे. कथांचा शेवट हा रंजक आहे. त्यामुळे या पुस्तकातील कथा या माणसाच्या मनाच्या अनेक पातळ्यांवरील भावनिक आंदोलने टिपतात. माणसाची अधुरी राहिलेली स्वप्ने, अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा, त्यातील वेदना, त्यामुळे नात्यातील गुंतागुंत इत्यादी गोष्टी लेखिकेने कथांमधून प्रभावीरितीने मांडल्या आहेत. माणसाचे अधुरेपण आणि पूर्णत्वाकडे जाण्यासाठीची धडपड यातील संघर्ष दाखवला आहे. हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास लेखिका सौ. कांबळी यानी व्यक्त केला आहे.