'शेवटचा निरोप– टपाल पेटीला'

'शेवटचा निरोप– टपाल पेटीला'

 


        पहाटेची वेळ, टेबलावर ठेवलेल्या पिवळसर जुन्या लिफाफ्याला हात लावताच मनात एक उबदार धडधड उमटते. कित्येक वर्षांपूर्वी आईने गावाहून पाठवलेल पत्र, वडिलांनी मोठ्या प्रेमाने लिहिलेली काहीशी वाकडी तिकडी अक्षरे, कुणा दूरच्या मित्राने टंचाईत घेतलेल्या कागदावर लिहिलेल अनमोल मनोगत, या सगळ्याचा आधार होता 'पोस्टाचे टपाल पेटी'. आज मात्र काळ पुढे सरकला आहे. मोबाईल, ई-मेल, व्हॉट्सअॅपच्या आवाजात टपोऱ्या लाल पेटीत टाकलेले पत्र कुणीही उचलून वाचणार नाही. सरकारने १ सप्टेंबर २०२५ पासून देशभरातील पोस्टाच्या टपाल पेट्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ही बातमी जशी ऐकू येते, तसतसे हृदयात एक शून्य निर्माण होते. त्या पेट्या केवळ लोखंडी डबे नव्हत्या. त्या हजारो हृदयांचे गुपित जपणाऱ्या, विरह-वेदनांचे साक्षीदार होत्या. पहिल प्रेम व्यक्त करण्याचा धाडसी प्रयत्न त्या पेटीतच सुरक्षित टाकला जायचा. परदेशी गेलेल्या मुलाचा "मी सुखरूप आहे" अस आईला कळवणार पत्र हिच्या पोटात उतरत असे. एखाद्या सैनिकाचा पत्त्यावर पोहचलेला वियोगाने भिजलेला संदेश तिच्यातून पुढे जात असे.आज जेव्हा ती पेटी बंद होईल, तेव्हा लोकांच्या आठवणींमधला एक जिवंत धागाच जणू तोडला जाईल. तंत्रज्ञानाने कितीही वेगाने धाव घेतली, तरी हाताने लिहिलेल्या अक्षरांतून उतरलेली मनाची ऊब या आधुनिक साधनांत कुठेच दिसत नाही. स्क्रीनवरचे शब्द चमकतात, पण कागदावरच्या शाईचा सुगंध मात्र मनाला अश्रृंशी जोडतो. १ सप्टेंबरनंतर जेव्हा रस्त्यावरील ती ओळखीची लाल पेटी कायमची काढून टाकली जाईल, तेव्हा गावोगावी एखाद्या पाखराच्या घरट्यासारख एक पोकळ घरट सोडलेल जाणार आहे. पुढच्या पिढीला आपण सांगाव लागेल  "कधी काळी लोक पत्रे लिहायचे, ती पेटीत टाकायचे, आणि त्यातून जगभर प्रेम पोहचायच." काळ बदलतो, साधन बदलतात, पण भावना बदलत नाहीत. म्हणूनच या टपाल पेट्या बंद होण्याचा क्षण म्हणजे केवळ एका सेवेला अलविदा नाही; तर ती काळाच्या पानावरचा भावुक निरोप आहे.