शिक्षक दिन विशेष

||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः||
||गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः||
शिक्षक या शब्दातच एक अद्भुत ताकद दडलेली आहे. आई-वडील आपल्याला जन्म देतात, वाढवतात; पण या जीवनाला योग्य दिशा देऊन जीवनमूल्यांची जाणीव करून देण्याचे कार्य शिक्षक करत असतो. म्हणूनच शिक्षकाचे स्थान आपल्या जीवनात सर्वोच्च मानाचे आहे.५ सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस या निमित्ताने शिक्षकदिन म्हणून पाळला जातो. त्यांनी “शिक्षक हा फक्त ज्ञानदाते नसून तो संस्कारांचा शिल्पकार आहे” असे सांगितले होते. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे सांगणारा व्यक्ती नव्हे तर आपल्या आतल्या जिज्ञासेला, स्वप्नांना दिशा देणारा मार्गदर्शक आहे. शिक्षक आपल्या मनातील अंधार दूर करून ज्ञानाचा दीप लावतो. आपल्याला विचार करायला, प्रश्न विचारायला आणि स्वतःची ओळख करून घ्यायला शिकवतो. बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षणी शिक्षकाचे मोलाचे योगदान आपल्याबरोबर असते.गावातील शाळेत मुलांना पहिली अक्षरे दाखवणारा प्राथमिक शिक्षक असो की विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकवणारा प्राध्यापक, त्यांच्या शिकवणीने प्रत्येकाच्या जीवनाचा पाया मजबूत होतो. शिस्त, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, मेहनत, सहकार्यभाव, आदर आणि जबाबदारी या गुणांचे बीज शिक्षक आपल्या मनावर पेरतो.आजच्या काळात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी गुरूंची जागा कोणी घेऊ शकत नाही. संगणक व इंटरनेट आपल्याला माहिती देतात, परंतु योग्य-अयोग्य निवडण्याचे शहाणपण फक्त शिक्षकच देऊ शकतो. जगण्याची कला, परिश्रमांचे महत्त्व, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य हे सर्व शिक्षकच शिकवतो. शिक्षक दिनी आपण आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांना कृतज्ञतेची वंदना करतो. त्यांचे प्रयत्न, त्यांचे त्याग आणि आपल्या भविष्यासाठी केलेले मार्गदर्शन हे लक्षात ठेऊन आपण सन्मान व्यक्त करतो.शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. राष्ट्राची प्रगती शिक्षकांच्या हातून घडते. म्हणूनच शिक्षकांना गुरुस्थानी मानणे ही आपली संस्कृती आहे. "गुरुंशिवाय ज्ञान नाही, संस्कार नाही, जीवनमूल्ये नाहीत" हे सत्य लक्षात घेऊन, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना बाळगली पाहिजे.शिक्षकांचा आदर करूया, त्यांच्या मार्गदर्शनाने उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होऊया हाच खरा शिक्षक दिनाचा संदेश आहे.