आडेली येथे मगर पकडण्यास वनविभागाला यश

वेंगुर्ला
आडेली-भंडारवाडी येथे सुमारे साडेसात फूट लांबीची मगर पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. सुगंध मयेकर या शाळकरी मुलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही मगर पकडणे शक्य झाले, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका मुलाला गावातील ओढ्यात ही मगर दिसली. घाबरून न जाता, त्याने ही माहिती तात्काळ ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी लगेच कुडाळ येथील वनविभागाच्या बचाव पथकाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव मोहीम सुरू केली.अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, अखेर मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले. या बचाव मोहिमेमध्ये वनक्षेत्रपाल अनिल गावडे, दिवाकर बांबार्डेकर, प्रसाद गावडे आणि वैभव अमृसकर यांचा समावेश होता. ग्रामस्थांपैकी सुधीर मुंडये, लऊ दाभोलकर, पिंट्या होडावडेकर, अर्जुन मुंडये, ज्ञानेश्वर मुंडये आदी उपस्थित होते. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या या मगरीला लवकरच तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.