सावंतवाडी पालिकेतील कंत्राटी कर्मचारी १५ सप्टेंबर पासून संपावर जाणार

सावंतवाडी
सावंतवाडी शहरात कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या ८५ हुन अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत त्यांचे मानधन प्राप्त झालेले नाही. त्यामुळे १५ तारखेपासून त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी सावंतवाडी नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. दरम्यान यावेळी फंड तसेच अतिरिक्त काम व अन्य कामाबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी संपाच्या दरम्यान या प्रश्नावर आवाज उठवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी पगार तटविणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अभय पंडित, मनोज घाटकर, इप्तिकार राजगुरू, बंड्या तोरसेकर, उमेश खटावकर, सुंदर गावडे, जॉनी फर्नांडिस यांच्यासह कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे, सागर खोरागडे, विनोद काष्टे, रवी जाधव, विजय कदम, शोहेब शेख, धोंडी अनावकर, बाबू कदम, मिलिंद तांबे, सचिन कदम आणि तुकाराम नेरुळकर उपस्थित होते. कामगारांनी या बैठकीत नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या दालनात बैठक होऊन पंधरा दिवस उलटले तरी, तांत्रिक कारणे सांगून नगरपरिषद अधिकाऱ्यांनी पगार दिलेला नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. थकीत पीएफ संदर्भातही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे कामगारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या कायदेशीर लढाईत कामगारांना वकील अॅड. अनिल निरवडेकर मोफत कायदेशीर मदत करणार आहेत. त्यांनी कामगारांसाठी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी दाखवल्याबद्दल कामगारांनी त्यांचे आभार मानले.या बेमुदत उपोषणात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, आफ्रोझ राजगुरू, मनोज घाटकर यांच्यासह गुरुकुलचे इतर कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.