अनंत चतुर्दशी.....एका सुंदर पर्वाची सांगता

हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेली तिथी म्हणजेच अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा होणारा सण आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूचे अनंत रूप पूजले जाते. 'अनंत' म्हणजे जो कधीही न संपणारा आहे आणि 'चतुर्दशी' म्हणजे चैतन्य शक्ती. 14 प्रकारची फुले,14 प्रकारची फळे, 14 प्रकारची धान्ये आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात. या व्रताच्या माध्यमातून संकटांपासून रक्षण व्हावे व सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करत गळ्यात बांधण्यासाठी चौदा गाठी असलेला दोरा धारण करतात. या व्रतामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे.अनंत चतुर्दशी मागील मुळ आख्यायिका म्हणजे पांडव द्युतात हरल्यानंतर त्यांना बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. यातूनच बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अनंताचे व्रत करण्याचा उपदेश केला. यानुसारच नागपंचमीपासून सुरू झालेल्या सणारंभातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत चतुर्दशी ही गणेशोत्सवाची सांगता देखील मानली जाते. दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन या दिवशी असते. अगदी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या आरोळ्या देत जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला जातो. यावेळी बाप्पाच्या विसर्जनापूर्वी पूजा व आरती केल्यानंतर केलेली सेवा मान्य करून, काही चूक झाल्यास क्षमा कर आणि तुझा कृपाशीर्वाद असाच कायम राहू दे व पुढच्या वर्षी लवकर परत ये असे साकडे गणरायाच्या चरणी घातले जाते. असा हा एक आनंद, पाणावलेल्या डोळ्यांची किनार लाभलेला दिवस ज्याच्या सांगतेतून शुभारंभ होतो तो म्हणजे एका नवीन उमेदीचा, ऊर्जेचा.