पितृपक्षास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व

पितृपक्षास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व

 
 

     आकाशावरचा निळसर पट शेवटी संध्याछटांकडे झुकतो आणि वाऱ्याच्या मंद झुळुकीत अचानक एक अदृश्य गूढता उमलते. कधी कावळ्याच्या कर्कश्य आवाजात, कधी मंदिरातील शंखध्वनीत, असे काही दिवस असतात जे आपल्याला आपल्या मूळांकडे ओढून नेतात. अशा दिवसांत काळाच्या पडद्यामागून जणू अदृश्य छाया हलकेच पृथ्वीवर ओसरताना भासत असतात. हेच दिवस म्हणजे पितृपक्ष.हिंदू संस्कृतीत पितृपक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. या काळात आपले पूर्वज, आपले पितर अदृश्य रूपाने आपल्या घराच्या, आपल्या परिवाराच्या सावलीत विराजमान होतात अशी समजूत आहे. या काही दिवसांत प्रत्येक घराघरांत श्राद्ध, तर्पण आणि पितृपूजा केली जाते. माणूस कितीही आधुनिक झाला तरी या काळात त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात एक अदृश्य दडपण, एक विरक्ती आणि एक गहन आदराची भावना जागृत होते.या दिवसात सर्वांत वेगळे आणि रहस्यमय स्थान जर कुणाला मिळाले असेल, तर ते मिळाले कावळ्याला. दैनंदिन जीवनात ज्याला अशुभ मानले जाते, ज्याच्या कर्कश्य आवाजाला अपशकुनाची छटा आहे, तोच कावळा या विशेष दिवसात अत्यंत महत्वाचा दूत मानला जातो. कारण असे की पित्रांचा आत्मा थेट आपल्याकडे न येता कावळ्याच्या रूपाने जवळ येतात असे पुराणकथांमधून सांगितले जाते.म्हणूनच पितृपक्षात आपण केलेले अन्नदान, पिंडदान किंवा नैवेद्य हा प्रथम कावळ्याला दाखवला जातो. कावळा जसा जसा त्या अन्नाला स्पर्श करतो, तसा पूर्वजांना तो नैवेद्य प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. यात एक अद्भुत सांस्कृतिक संदेश दडलेला आहे  निसर्गातील प्रत्येक जीव हा आपल्याला आपल्या पित्रांशी जोडून ठेवतो.साधारणतः वर्षभर कावळ्याला दुर्लक्ष, टाळणे किंवा अशुभ मानण्याची पद्धत आहे. परंतु ह्याच काही दिवसांत त्याला मान, आदर, आणि विशेष स्थान दिले जाते. यातून एक गहन जीवनतत्त्व डोकावते जीवनातील प्रत्येकाला, प्रत्येक अस्तित्वाला आपले वेगळे महत्व आहे, आणि तो योग्य काळ येताच समोर प्रकट होते.या दिवसांचा मूळ उद्देश केवळ विधी किंवा भीती नव्हे, तर कृतज्ञता आहे. आपल्या अस्तित्वाची मुळे आपल्या पूर्वजांच्या जीवनाशी जोडलेली आहेत. त्यांचा स्मरणोत्सव म्हणजे पितृपक्ष. कावळ्याच्या माध्यमातून हा स्मरणोत्सव अधिक गूढ, अधिक गहन आणि अधिक रहस्यमय पद्धतीने प्रकट होतो.पितृपक्ष म्हणजे अदृश्यतेच्या छायेतून उमटणारा संदेश  “मनुष्य कितीही पुढे गेला तरी त्याचे मुळे त्याला नेहमी मागे खेचतात, आणि त्या मुळांना वंदन केल्याशिवाय पुढचा प्रवास पूर्ण होत नाही.”