ओसरगाव येथे त्या अर्धवट जळलेल्या महिलेचा खूनच

वेंगुर्ला
नुकतेच कणकवली येथील ओसरगाव येथे अर्धवट जळलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. घातपात की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे त्या अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरचीवाडी येथील सौ. सुचिता सुभाष सोपटे (वय ५९) हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सोपटे या चार दिवसापासून बेपत्ता होत्या. तसेच तिला मारून व अर्धवट जाळून टाकणाऱ्या संशयीत आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाला यश आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आज आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.मृतदेह मिळाल्यापासून अवघ्या काही तासात आरोपीला पकडण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान हे एकट्या व्यक्तीच्या माध्यमातून होणे अशक्य असेल त्यामुळे निश्चितच या घटनेत आरोपी सोबत अन्य व्यक्तींचा सहभाग असावा अशी सर्वत्र चर्चा होत आहे. जळालेली महिला ही घटनेच्या आदल्या दिवशी पासून बेपत्ता होती. ही घटना घडण्यासाठी आरोपी आणि त्या महिलेची गाठ भेट कशी झाली? घटनेवेळी अन्य व्यक्तींचा सहभाग होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अन्य कोण्या व्यक्तींचा सहभाग असेल तर ते केवळ जळीत मृत महिला आणि आरोपी या दोघांच्या मोबाईल सीडीआर रिपोर्टनुसार सिद्ध होऊ शकते.त्यामुळे तिला एवढ्या निर्दयीपणे का ठार मारण्यात आले याचा तपास देखील पोलीस करीत आहेत.