इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हवाई हल्ला; १०० लोक ठार.

इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हवाई हल्ला; १०० लोक ठार.

जेरूसलेम.

   गाझा पट्टीत सुरु असलेलं युद्ध थांबणार नाही. उलट ते अजून भीषण बनत चाललं आहे. इस्रायलने आज शनिवारी गाझा पट्टीतील एका शाळेवर हवाई हल्ला केला. यात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. पूर्व गाझामध्ये ही शाळा आहे. विस्थापित झालेले लोक या शाळेमध्ये राहत होते. रॉयटर्स आणि पॅलेस्टिनची न्यूज एजन्सी वाफाने ही माहिती दिली आहे. “लोकांची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. विस्थापित लोक या शाळेत राहत होते. फजर म्हणजे त्यांची सकाळची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला.
   युद्ध सुरू झाल्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राहते घर सोडावे लागलेल्या हजारो पॅलिस्टिनी नागरिकांनी गाझा शहरातील अनेक शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यातल्याच मध्यवर्ती भागात असलेल्या तबीन शाळेला इस्रायलच्या लष्कराने लक्ष्य केले. या शाळेत सहा हजार जण आश्रयाला आले होते. शनिवारी पहाटे, शाळेत तळमजल्यावर असलेल्या मशिदीत सूर्योदय होण्याआधीची नमाज पढत असतानाच कोणतीही पूर्वसूचना न देता हा हल्ला झाल्याचे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या अबू अनस याने सांगितले. त्यावेळी काही जण नमाज पढत होते, तर काही गाढ झोपेत होते. त्याचवेळी कोणताही इशारा न देता पहिले क्षेपणास्त्र त्यांच्या दिशेने झेपावले, नंतर दुसरे. या भीषण हल्ल्यानंतर केवळ लहान मुले, बायका आणि वृद्धांचे अवशेष उरले होते, असे अबू सांगतो.
   तीन क्षेपणास्त्रांनी ही शाळा अक्षरशः होत्याची नव्हती झाली. हल्ल्यानंतर या परिसराला अवकळा आली होती. पडझड झालेल्या भिंती, अस्ताव्यस्त पडलेले फर्निचर, जमिनीवर पसरलेले रक्ताचे थारोळे अन् रक्ताने माखलेले कपडे पाहून थरकाप उडत होता. त्यातही स्वयंसेवक मदतीसाठी सरसावले. गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयात ७० जणांचे शव पोहोचले होते. जखमींपैकी काही गंभीर भाजले होते, तर संसर्ग होऊ नये म्हणून अनेकांचे अवयव कापावे लागल्याचे रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले. अनेकांचे मृतदेह तर ओळखण्यापलीकडे पोहोचले होते. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती गाझातील सरकारचे प्रवक्ते मोहम्मद बस्सल यांनी व्यक्त केली आहे.