बदललेल्या काळातील बदललेली साक्षरता

साक्षरता म्हणजेच मानवी जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावणारी संकल्पना.आता म्हणायला गेल तर लिहिता वाचता येणारा म्हणजेच साक्षर इतकाही अर्थ पुरेसा होतो. पण बदललेला काळ बघता हे पुरेस आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) ने 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाची सुरुवात केली. यामागील मूळ उद्देश हाच होता की समाजातील अज्ञानता दूर व्हावी आणि समाज प्रगतीपथावर जावा. अर्थात त्या काळात ते गरजेचे होतेच. कारण अवाढव्य लोकसंख्या निरक्षरतेमुळे देशाच्या विकासात अडथळा बनत होती. थोडक्यातच निरक्षरता समाजाच्या ऱ्हासाचे कारण ठरू लागली. ज्यामुळे साक्षरता दिनाची प्रणाली सुरू करणे गरजेचे बनले. यामुळे भारतासारख्या बलाढ्य आणि सक्षम देशाला प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्या आणि प्रगतीच्या वाटेकडे देशाची पाऊले वेगाने पडू लागली. उद्योगधंदे, शिक्षण, शेतीव्यवसाय, विज्ञान तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्र अशा अनेक ठिकाणी झपाट्याने परिवर्तन देखील झाले. पण आजही या प्रयत्नांना हवे तसे यश मिळालेले दिसत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजेच साक्षरतेचा घेतलेला मर्यादित अर्थ. अर्थात साक्षरता केवळ आपले समाजातील स्थान मजबूत करत नाही, तर आपल्याला स्वतःची प्रगती करत समाजासाठी काहीतरी करण्याचे स्थैर्य प्रदान करते.आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. पण तरीही अंधश्रद्धेला बळी पडणारा समाज दिसतोच आहे. जादूटोणा, करणी यांसारख्या कल्पनांवर विश्वास ठेवणारी माणसे आजही आहेत. शिक्षणाने आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली, आणि संविधानाने आपल्याला मते मांडण्याचे हक्क दिले, पण खरच या समाजाला साक्षर म्हणाव तर आजही स्त्रिया सुरक्षित आणि निश्चित बाहेर पडू शकत नाहीत. आजही कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. सर्वांचे पोट भरणारा बळीराजा कर्जबाजारी सारख्या व्यथेत आजही आहे. जातीपातीवरून होणारे वाद आजही जिवंत आहेत. स्त्री भ्रूणहत्याही थांबलेली नाही. मग कसली प्रगती केली आपण? हेच नाही यासारखे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. आणि आपण डोळसपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. मग साक्षरतेचा हा अजेंडा मिरवण कितपत बरोबर आहे? ही विचार करण्याची गोष्ट आहे.