जागतिक टपाल दिवस......भावनांच्या पत्रांचा सोहळा

जागतिक टपाल दिवस......भावनांच्या पत्रांचा सोहळा

 

       आजच्या मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात आपण काही क्षणांतच “Hi” म्हणू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, पण एक काळ होता जेव्हा माणसांच्या भावना कागदावर उतरायच्या, आणि त्या भावना घेऊन एक टपालवाला दाराशी येत असे. म्हणूनच प्रत्येक वर्षी ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो,  त्या अमर संवाद माध्यमाला, त्या भावनांच्या दूताला, आणि त्याला आदराची वंदना करण्यासाठी.

 

पत्राचे युग:आठवणींचा सुवर्णकाळ

     कधी आईने मुलाला गावातून शहरात पत्र लिहिल, “बाळा, तब्येत ठिक आहे ना?” कधी प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी ओळींमध्ये साठवून ठेवल्या काळजाच्या लहरी, तर कधी सैनिकासाठी एखाद पत्रच त्याच्या मनाचा आधार ठरल.त्या शाईच्या ओळींना सुगंध असायचा मातीतला, माणुसकीचा, भावनांचा. टपाल फक्त वस्तू नव्हता; तो होता भावनांचा प्रवासी. पोस्टमनाच्या खांद्यावरची ती चिठ्ठ्यांची पिशवी म्हणजे कितीतरी मनांच्या आशा, आतुरतेच्या स्वप्नांचा खजिना होता. रोजच्या धावपळीत काही क्षण थांबवून लोक त्याला विचारायचे, “माझ पत्र आल का रे?” आणि त्याच्यात होती संवादाची खरी उब.

 

टपाल विभाग:अंधाऱ्या वस्तीतील उजेड

       भारताच्या प्रत्येक गावात, प्रत्येक कोपऱ्यात पोचलेली सुविधा म्हणजे टपालसेवा. आजही दुर्गम भागात ज्या ठिकाणी इंटरनेटच जाळ पोहोचलेल नाही, तिथे टपाल कार्यालय हेच माहिती, व्यवहार आणि विश्वासाच केंद्र आहे. टपाल विभागाने वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार फक्त पत्र नाही, तर जोडलेली माणस वितरित केली आहेत. मनीऑर्डर, बचत खाते, स्पीड पोस्ट हे सारे टपालाचे नवे रूप आहेत, पण त्याचा पाया आहे विश्वास.पोस्टमन ही फक्त नोकरी नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक गावचा ओळखीचा चेहरा, जो आनंद व दु:ख दोन्ही घेऊन घराघरात पोहोचतो.

 

डिजिटल युगात पत्राचे स्थान

       आज “ई-मेल” आणि “व्हॉट्सॲप मेसेज”च्या लाटेत पारंपरिक पत्र मागे गेलं आहे, पण त्याच महत्त्व कधी कमी झाल नाही. एक हस्तलिखित पत्र ही केवळ कागदावरची ओळ नाही, ती आत्म्याची छाया आहे. त्या पत्रावरचा प्रत्येक शब्द, प्रत्येक ठिपका, लेखकाच्या मनातील कंपन घेऊन येतो.म्हणूनच, कितीही आधुनिकता आली तरी “हस्ताक्षरातील ओलावा” हा कुठलाही डिजिटल संदेश देऊ शकत नाही.टपाल दिनाचा संदेश जागतिक टपाल दिवस आपल्याला आठवण करून देतो  संवादाचा मानवी चेहरा जपा.टपाल ही केवळ यंत्रणा नाही, ती माणसांना जोडणारी साखळी आहे. या दिवशी आपण त्या पोस्टमनचा, त्या पत्रवाहकाचा, वाचनालयातील पत्रपालाचा आदर करायचा आहे ज्यांनी आपल्या शब्दांना दिशा दिली.पत्र लिहिणे ही एक संकुचित कला नाही, ती भावना व्यक्त करण्याची एक साधना आहे.

 

आजचा दिवस आपण नव्या पिढीला सांगायचा की 

     “एकदा का तू पत्र लिहिलस, तेव्हा तू वेळ थांबवून माणसाशी बोलतोस.”जागतिक टपाल दिवसाच्या या निमित्ताने चल, पुन्हा एक पत्र लिहूया. आईला, मित्राला, किंवा कदाचित स्वतःलाच. कारण काही भावना टाइप होत नाहीत, त्या फक्त लिहिल्या जातात.