राष्ट्रीय हिंदी दिवस विशेष

राष्ट्रीय हिंदी दिवस विशेष

 


      भाषा ही विचारांची वीणा आहे, संस्कृतीच्या स्वरांची धारा आहे." स्वतःची मातृभाषा असो वा राष्ट्रभाषा, तिच्याविना जीवन जणू संगीताविना सूरच! १४ सप्टेंबर हा दिवस आपल्या राष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे.या दिवशी हिंदीला भारताची राजभाषा म्हणून मान्यता मिळाली आणि त्यामुळे १४ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी "हिंदी दिवस" म्हणून साजरा केला जातो हिंदी ही भारताची राजभाषा आहे. लोकभाषांच्या महासागरातली ही एक निखळ गंगा आहे सरळ, साधी, स्नेहाळ. हिंदीत विचार मांडताना कोणताही कृत्रिमपणा लागत नाही. हृदयातील भावना सहज ओघवत्या शब्दांतून बाहेर पडतात. संत कबीरांचे दोहे, तुलसीदासांचा रामचरितमानस, प्रेमचंदांची कथा, माखनलाल चतुर्वेदींच्या कविता हिंदी साहित्य म्हणजे भावनांचा खजिना!हिंदी ही केवळ संवादाचे साधन नाही, तर संस्कृतीचे ओजस्वी दर्पण आहे.हिंदी दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, कार्यालये या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात. भाषणस्पर्धा, निबंधलेखन, कवितावाचन या कार्यक्रमांतून भाषा अधिक समृद्ध केली जाते. हा दिवस आपल्याला स्मरण करतो की आपल्या मातृभाषेबरोबरच देशाची राजभाषा जपणे देखील आपली जबाबदारी आहे.हिंदी दिवस आपल्याला स्मरवतो की भाषा ही राष्ट्रीय एकतेची पायाभूत वीट आहे. आपली मातृभाषा जपा, पण हिंदीशीही नात ठेवायला विसरू नका. कारण हिंदी ही हृदयांची नाळ असून संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि राष्ट्राच्या उभारणीची भक्कम भिंत आहे.