न्हैचीआड येथील तरुणाचा अपघातात मृत्यू.

न्हैचीआड येथील तरुणाचा अपघातात मृत्यू.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला शिरोडा मार्गावर सागरतीर्थ बागकरवाडी येथे मोटारसायकलचा अपघात होऊन आसोली न्हैचीआड येथील संकेत किशोर पेडणेकर (२५) वर्षे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
   न्हैचीआड येथील संकेत किशोर पेडणेकर हा तरुण आपल्या ताब्यातील मोटारसायकलने (एम एच ०७ ए के ६१२०) मोपा विमानतळावरून आपली नाईट शिफ्ट करून घरी परतत असताना अपघात घडला ही घटना शुक्रवारी रात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडली.संकेतच्या अपघाती मृत्यूमुळे आसोली न्हैचीआड गावावर शोककळा पसरली आहे.
   गोवा येथे नोकरीसाठी जाणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याने सिंधुदुर्गातील बेरोजगारांची शोकांतिका समोर आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात कामानिमित्त जाणाऱ्या तरुण - तरुणीचा अपघाती मृत्यू होण्याची ही १० दिवसांतील तिसरी घटना आहे. याआधी मातोंड पेंडूर येथील संजय जळवी वय (४५) व कळणे येथील सुजाता सातार्डेकर वय (२५) यांचा कामावरून घरी परतत असताना अपघात होऊन मृत्यू झाला होता.
   संकेत पेडणेकर हा मोपा विमानतळावर टेक्निशियन म्हणून काही महिन्यांपूर्वीच तो कामाला लागला होता.वडील घरीच असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी याच्यावर होती.त्याच्या पश्चात वडील, आई, बहीण असा परिवार आहे.अमेय इंडीयन ट्रॅव्हल्स बुकिंगचे मालक हेमंत पेडणेकर यांचे ते पुतण्या होत.
   सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढतानाचे चित्र दिसत आहे.यामुळे येथील तरुण - तरुणी पोट भरण्यासाठी शेजारील गोवा राज्यात कामाला जातात.मात्र हेच काम तरुण- तरुणींच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील असणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे.मात्र एकीकडे जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी हे तरुणांना रोजगार जिल्ह्यातच निर्माण करणार असल्याच्या घोषणा करून तरुणांना नोकरीची खोटी आमिष दाखवत आहेत.जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय स्वार्थासाठी रोजगाराची खोटी आश्वासने देऊन रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध करून न देता रोजगाराच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसले आहेत.पोटाची खळगी भरण्यासाठी गोवा राज्यात कामाला जाणाऱ्या तरुण तरुणीचा होणाऱ्या अपघाती मृत्युला जबाबदार कोण ? आणि अजून किती मृत्यूंची हे मंत्री, लोकप्रतिनिधी व शासन वाट पाहणार आहे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.