वेंगुर्लेत आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसचे ऑनलाईन उद्घाटन

वेंगुर्ले
कृषीभूषण आबासाहेब उर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वेंगुर्ला येथे शॉर्ट टर्म कोर्सेसचा उद्घाटन समारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने दिमाखात पार पडला.
या उपक्रमाची संकल्पना मा. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ऑनलाईन उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला.
स्थळावरील शॉर्ट टर्म क्लासरूमचे उद्घाटन नायब तहसिलदार राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी किशोर कृष्णा गावडे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई, पंचायत समिती वेंगुर्ले कार्यालयाचे मांजरेकर, महिला काथ्या कारखाना वेंगुर्ला संचालिका प्रज्ञा परब, आयएमसी मंत्री महोदय नामनिर्देशित सदस्य विनायक खवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयएमसी सचिव तथा प्रभारी प्राचार्य जगदीश गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी संस्थेत सुरू होणाऱ्या शॉर्ट टर्म कोर्सेसविषयी सविस्तर माहिती दिली आणि स्थानिक इच्छुक उमेदवारांना प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निदेशक जे. डी. डिसिल्वा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद कोदे, सारीका साबळे, सोनाली लिखारे, नंदकुमार नरतवडेकर, देवेश सावंत, अर्जुन गवस, लक्ष्मण नाईक, बाळकृष्ण मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ निदेशक संदीप धुरी यांनी केले. शॉर्ट टर्म कोर्सेसच्या प्रवेशासाठी संदीप धुरी व सारीका साबळे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी व स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.