जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे. यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणांनी सतर्क राहावे. चेकपोस्टवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे.

konkansamwad 
