स्वामी विवेकानंद: एक तेजस्वी विचारसूर्य
भारतभूमी ही केवळ भौगोलिक संकल्पना नाही; ती विचारांची तपश्चर्या आहे, संस्कारांची गंगा आहे आणि आत्मज्ञानाची परंपरा आहे. या परंपरेतूनच १२ जानेवारी १८६३ रोजी एका तेजस्वी विचारसूर्याचा उदय झाला! स्वामी विवेकानंद. त्यांच्या जयंतीचा दिवस म्हणजे केवळ एक स्मृतिदिन नव्हे, तर राष्ट्राच्या आत्म्याला जागृत करणारा विचारोत्सव आहे.
स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ संन्यासी नव्हते, ते होते चालते-बोलते आत्मविश्वास. त्यांच्या डोळ्यांत भारताचे भविष्य चमकत होते आणि त्यांच्या शब्दांत युग बदलण्याची ताकद होती.कोलकात्यात जन्मलेले नरेंद्रनाथ दत्त हे बुद्धिमान, तर्कशुद्ध आणि प्रश्न विचारणारे तरुण होते. “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ कुतूहल नव्हता, तर त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. हा शोध त्यांना घेऊन गेला रामकृष्ण परमहंस यांच्या चरणांशी. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रनाथांना आत्मज्ञानाचा आरसा दाखवला आणि तेथूनच जन्म झाला,स्वामी विवेकानंदांचा.१८९३ साली शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी “My brothers and sisters of America…” असे संबोधन करताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. त्या एका वाक्यात भारताचे अध्यात्म, सहिष्णुता आणि मानवतावाद सामावलेला होता. त्या क्षणी भारत गुलाम होता, पण भारताचा आत्मा मात्र मुक्त होऊन जगासमोर उभा राहिला.
स्वामी विवेकानंदांनी जगाला सांगितले
“धर्म म्हणजे वाद नव्हे, तो अनुभव आहे.”
“मानवसेवाच ईश्वरसेवा आहे.”
स्वामी विवेकानंदांचे विचार विशेषतः युवकांसाठी होते.
“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका”! हा मंत्र आजही काळाच्या पलीकडचा आहे.त्यांना अश्रू गाळणारा नव्हे, तर संघर्ष करणारा युवक हवा होता. कमकुवतपणा, भीती, आत्मन्यूनता, हे त्यांना पाप वाटत असे. त्यांच्या मते आत्मविश्वास म्हणजेच खरी श्रद्धा.स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेले रामकृष्ण मिशन हे केवळ आध्यात्मिक केंद्र नाही, तर समाजसेवेचे जिवंत विद्यापीठ आहे. शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण, सेवेला त्यांनी साधनेचे स्वरूप दिले.आजचा समाज तंत्रज्ञानात पुढे गेला असला, तरी विचारांमध्ये गोंधळलेला आहे. अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे विचार दीपस्तंभासारखे मार्ग दाखवतात. राष्ट्रनिर्मिती ही केवळ राजकारणातून नाही, तर चरित्रातून होते, हे त्यांनी शिकवले.स्वामी विवेकानंदांचे शरीर नश्वर होते, पण त्यांचे विचार अमर आहेत. ते आजही प्रत्येक युवकाच्या रक्तात स्फुरण निर्माण करतात, प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवतात.स्वामी विवेकानंद जयंती म्हणजे, स्वतःला ओळखण्याचा दिवस, राष्ट्रासाठी उभे राहण्याचा दिवस आणि मानवतेसाठी जगण्याचा संकल्पदिन.

konkansamwad 
