दोडामार्ग : इतिहास माणुसकी आणि निसर्ग

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात लहान पण वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. दोडामार्ग तालुक्याचा वर्धापनदिन स्थानिकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तालुक्याने गेल्या दोन दशकांत आपल्या प्रगतीचा वेगवान प्रवास केला आहे. ब्रिटिश काळातही या भूमीने आपली सांस्कृतिक ओळख जपली.1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली असून दोडामार्ग तालुक्याची स्थापना 27 जून 1999 रोजी झाली. यापूर्वी हा भाग सावंतवाडी तालुक्यात होता, पण स्वतंत्र प्रशासकीय सोयीसाठी दोडामार्ग हा नवा तालुका म्हणून निर्माण करण्यात आला. गेल्या काही काळात, दोडामार्गमध्ये कृषी क्षेत्रात मोठी भर पडली आहे, केरळमधून आलेल्या लोकांनी अननस आणि केळीची लागवड सुरू केली, ज्यामुळे आज दोडामार्ग तालुक्यात अननस हे एक प्रमुख उत्पादन झाले आहे. तसेच तिलारी प्रकल्पामुळे सिंचनाचा लाभ मिळून शेती फुलली आहे. येथील जंगलातील हत्तींच्या वावरामुळे हा भाग महाराष्ट्रातील एकमेव हत्तींचा निवासस्थान ठरला आहे. दोडामार्ग मध्ये हत्तींच्या वावरामुळे शेतकरी आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक आणि जीवितहानीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यावर तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक आहेत. दोडामार्ग तालुक्याचा वर्धापनदिन म्हणजे या भूमीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्ग वैभवाचा उत्सव! हा दिवस म्हणजे एकत्र येऊन, आपली माती, आपली संस्कृती आणि आपली प्रगती यांचा गौरव करण्याचा क्षण. शाळांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रम तसेच सांस्कृतिक स्पर्धा, वृक्षारोपण आणि इतिहासाचे स्मरण अशा उपक्रमांनी हा दिवस साजरा होतो. दोडामार्ग तालुक्याचे वर्धापन दिन ही केवळ एक तारीख नाही, तर आपल्या मातीच्या गौरवाची, निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या संस्कृतीची आहे. प्रगतीच्या नव्या वाटेवर चालणाऱ्या लोकजीवनाची जाणीव, या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या दोडामार्गच्या उज्वल भविष्याची शपथ घेऊया!
दोडामार्गच्या भूमीत तिलारी धरण, तिलारी धबधबा, घनदाट जंगल आणि जैवविविधतेने नटलेली अनेक ठिकाण आहेत. या परिसरातील पर्यटन स्थळ- तिलारी धबधबा, वीजघर आणि सह्याद्रीच्या रांगांमधील रम्य गाव-आजही इतिहासाचे साक्षीदार आहे. येथील शांतता, हिरवाई आणि प्राचीन मंदिर, गावांचे पारंपारिक सण-उत्सव, हे सगळे दोडामार्गच्या सांस्कृतिक ओळखीला समृद्ध करतात. या तालुक्यातल्या मातीतील संघर्ष, श्रम, आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही इथल्या लोकजीवनात, बोलीभाषेत आणि निसर्गरचनेत उमटतात. हे पाऊलखुणा म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर येणाऱ्या भविष्यातील विकासाच्या प्रगतीची वाटचाल आहे.
सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाचा गंध..
दोडामार्ग वर्धापनदिन, आनंदाचा छंद..
डोंगरदऱ्यात न्हालेल, हिरवळीत न्हालेल...
तिलारीच्या पाण्यात स्वप्नांच फुललेल...
संघर्षाच्या वाटा, आशेचा किरण..
नवनिर्मितीच्या स्वप्नांना मिळाले नवे रंग...
गोव्याच्या दारी, कर्नाटकाच्या शेजारी..
महाराष्ट्राच्या मातीला लाभली नवी सारी...
काजूच्या बागा, अननसाचा गंध..
शेतकऱ्यांच्या घामात प्रगतीचा छंद..
धरणाच्या लाटांवर, भविष्याची आशा..
दोडामार्ग मातीला नव्या युगाची भाषा..
विकासाच्या गगनभरारी, स्वप्नांची उंच भरारी..
निसर्ग, संस्कृती, श्रमांची नवी कहाणी..
वर्धापनदिनाच्या या मंगल क्षणी..
दोडामार्गच्या प्रगतीला वंदन माझ मनी...