शिवनेरी किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला, ५० हून अधिक पर्यटक जखमी

पुणे
पुणे येथील शिवनेरी किल्ल्यावर फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत दुर्घटना घडली असून अचानक मधमाश्यांच्या थव्यातून मोठा हल्ला झाल्याने तब्बल ५० हून अधिक पर्यटक जखमी झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिराजवळ आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर हल्ला केला. दरम्यान, आग्या मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 60 पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांना तातडीने गडावरून खाली येण्यास सांगितल. त्यानंतर आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्स शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्या. यावेळी वनविभागाकडून माश्यांना शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आहे. दगड मारल्यामुळे मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पर्यटकांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शिवनेरी किल्ल्यावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळाले. वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने मधमाश्यांच्या पोळ्यांचे निरीक्षण सुरू केले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.