वेंगुर्ला तालुक्यातील परुळे विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथे आदर्श विद्यार्थी १९८८ बॅचचा स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर सभागृहात संपन्न झाला. एसएससी १९८८ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे आयोजन केले. या कार्यक्रमास विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ परुळे या शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा आदर्श विद्यार्थी बॅच १९८८ तर्फे सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले व २०३१-३२ मध्ये होणाऱ्या शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास त्यांना आमंत्रित केले. माजी मुख्याध्यापक बी.एस.नाईक व ए. एम. तेली यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले व यापुढेही विद्यार्थ्यांकडून असेच कार्यक्रम होत रहावे, यासाठी त्यांना प्रोत्साहीत केले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करून भाषण केले व या वयातही तरुणांना लाजवणाऱ्या त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. त्यावेळी माजी विद्यार्थी समीर कांबळी यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमास रंगत आणली. निलिमा नाईक यांनी प्रास्ताविक सादर केले तर स्वागत सोहळा व सत्कार समारंभाचे निवेदन अंजली घोलेकर व सुचिता हादगे यांनी केले. शारदा घोलेकर व राधाकृष्ण परब यांनी शाळेबाबत आपले मनोगत व्यक्त करून शाळेशी निगडीत आठवणींना उजाळा दिला. यावेळी १९८८ बॅच कडून शाळेला ११ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. त्यानंतर आजी-माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेवटी संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.