वायंगणी कासव महोत्सव उत्साहात संपन्न.
वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ला तालूक्यातील' कासवांचे गाव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे वायंगणी कासव महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चालणाऱ्या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनविभाग आणि समस्त ग्रामस्थ वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले होते. सदर कासव महोत्सवास उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपकभाई केसरकर हे उपस्थित होते .त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती उद्घाटन प्रसंगी लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ऑलिव्ह रिडले कासवांच्या वाळू शिल्पाचे अनावरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गप्रेमी आणि पर्यटक यांच्या उपस्थितीत ऑलिव्ह रिडले कासवांच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले. त्यानंतर महोत्सवात स्थानिक कासवमित्र यांचा मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला, त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी कासवाबंददल माहिती देणारे सादरीकरण केले. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान उपस्थित निसर्गप्रेमी यांना दिली.कार्यक्रमाच्या पुढील सत्रात निसर्गप्रेमींना 'कोकणी रानमाणूस' यांनी वन्यजीव संवर्धन कार्यात स्थानिक लोकांचा सहभाग आणि पर्यावरण पूरक निसर्ग पर्यटन या विषयी आपले विचार मांडले. यानंतर पुढील सत्रात विविध ठिकाणी क्षेत्रभेट, परिसंवाद आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम दशावतार नाटक" कुर्मावतार "आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी सावंतवाडी श्री. निकम, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, सावंतवाडी सहा.वनसंरक्षक सुनील लाड इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
तसेच या महोत्सवा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या हॅचरी मधून जसे की फळीयेफोंडा, सागरतीर्थ, उभादांडा, तोंडवली, तळाशील, आचरा, मोचेमाड, इत्यादी ठिकाणाहून पिल्लांना निसर्गात अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना में २०२४ पर्यंत मिळणार आहे. त्या करिता संबधित ठिकाणच्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.