सुती हातरूमालावर छापली लग्नपत्रिका
मालवण
लग्नपत्रिका, वाढदिवस किंवा अन्य निमंत्रण पत्रिका छपाईसाठी कागद, प्लास्टिक आदी साधने व विषारी शाई वापरली जाते. याबाबत जनजागृती म्हणून मालवण नगरपरिषदेचा कर्मचारी अनिकेत चव्हाण याने आपल्या विवाहाची निमंत्रण पत्रिका चक्क सुती हातरुमालावर छापून, पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला. अशी निमंत्रण पत्रिका छापण्याचा हा हटके प्रयोग सिंधुदुर्गात चर्चेचा विषय ठरला आहे.त्याच्या 'हातरुमालावरील आमंत्रण पत्रिका' या आगळ्या -वेगळ्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. हातरूमालावर स्क्रिन प्रिटिंग अथवा ऑफसेट प्रिटिंगव्दारे मजकूर छपाई केली जाते. छपाई केलेला हा मजकूर दोन ते तीन धुण्यात निघून जातो, मात्र हात रूमाल पुढे दैनंदिन वापरासाठी वापरता येतो. खरेतर एखादी निमंत्रण पत्रिका आपल्याकडे आल्यावर तिची जपणूक तो कार्यक्रम होईपर्यंत होते. त्यानंतर या पत्रिका रद्दीत, कचऱ्यात जातात. मात्र यात पर्यावरणाची मोठी हानी होते.अनेक वेळा अश्या पत्रिकांवर महापुरुषांची, देव-देवतांची छायाचित्रे असतात. अनावधानाने त्यांचाही अवमान व विटंबना होते. अशावेळी निमंत्रण पत्रिकेच्या पुनर्वापरास प्रोत्साहन देणारा असा पर्यावरणपूरक प्रयोग अंमलात आणल्यास तो सर्वार्थाने उपयुक्त ठरणारा. सिंधुदुर्ग सुपुत्र असलेले, पुण्यातील रहिवासी उदय गाडगीळ यांनी सिंधुदुर्गातील नाभिक समाज नेते विजय चव्हाण यांचा पुतण्या अनिकेत चव्हाण व चि. सौ. का. सायली चव्हाण यांच्या झालेल्या लग्नासाठी या पत्रिका हातरूमालावर छापून दिल्या. अशीच एक लग्नपत्रिका उदय गाडगीळांनी, आपल्या मुलीची लग्नपत्रिका छापून त्यांनी पंतप्रधानांना पाठविली होती. पंतप्रधान कार्यालयाने या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले होते.

konkansamwad 
