महात्मा गांधी: सत्याग्रही समाजवादाचे जनक

मोहनदास करमचंद गांधी हे केवळ एक नाव नाही, तर सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मूल्यांचा जिवंत वारसा आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे जन्मलेला हा सर्वसामान्य माणूस, पुढे जगाला शांततेच्या क्रांतीची दिशा देणारा युगपुरुष बनला. गांधीजींचा जीवनप्रवास एका वकिली करणाऱ्या सामान्य व्यक्तीपासून सुरू होतो. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले, बॅरिस्टर झाले आणि भारतात परतले. पण आयुष्याची खरी परीक्षा आणि त्यांच्यातील नेतृत्वाला ठिणगी पडायची होती ती दक्षिण आफ्रिकेत! १८९३ मध्ये, एका रेल्वे प्रवासात त्यांना त्यांच्या वर्णामुळे पीटरमारित्झबर्ग स्टेशनवर ट्रेनमधून अपमानास्पद पद्धतीने खाली उतरवण्यात आले. हा क्षण गांधीजींसाठी केवळ एक अपमान नव्हता, तर त्यांना अन्यायाची आणि विषमतेची तीव्र जाणीव करून देणारा अनुभव होता. या एका घटनेने मोहनदासच्या आयुष्याची दिशाच बदलली! त्याच रात्री, त्या स्टेशनच्या प्रतीक्षालयात बसून त्यांनी ठरवले की, या अन्यायाविरुद्ध लढायचे, पण तलवारीने नाही, तर विचारांनी! इथूनच, त्यांच्या आयुष्याच्या महाकाव्याची सुरुवात झाली आणि 'सत्याग्रह' नावाच्या एका नव्या शस्त्राचा जन्म झाला. यानंतर, हाच सर्वसामान्य माणूस, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आधारस्तंभ आणि जगाला प्रेरणा देणारा 'महात्मा' बनला.१९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणाला जनसामान्यांशी जोडले. चंपारण्य, खेडा आणि अहमदाबाद येथील आंदोलनातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, दांडी यात्रा आणि 'छोडो भारत' यांसारख्या मोठ्या चळवळींनी ब्रिटिश सत्तेची पाळेमुळे हादरवून टाकली. गांधीजींची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवले नाही, तर सामाजिक समता, अस्पृश्यतानिवारण आणि ग्रामस्वराज्याच स्वप्न पाहिल. त्यांच्या मते, भारताचा आत्मा खेड्यांमध्ये वसलेला आहे आणि खरा विकास तेव्हाच होईल, जेव्हा खेड्यांमध्ये स्वयंपूर्णता येईल. आज, जगात वाढणारे संघर्ष, पर्यावरणाचे प्रश्न आणि विषमतेची दरी पाहता, गांधीजींचा अहिंसेचा संदेश आणि साधे जीवन, उच्च विचार ही शिकवण अधिक मोलाची वाटते. गांधींचा समाजवाद हा पाश्चात्त्य भौतिकवादी समाजवादाहून भिन्न होता.पाश्चात्त्य समाजवाद प्रामुख्याने भौतिक प्रगती आणि आर्थिक समानतेवर लक्ष केंद्रित करतो, तर गांधींचा समाजवाद नैतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित होता. गांधींनी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या औद्योगिकीकरणाला विरोध केला, कारण त्यांना वाटत होते की त्यामुळे बेरोजगार वाढेल आणि समाजाचे शोषण होईल. त्यांनी चरख्यासारख्या कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले, कारण त्यामुळे लोकांना स्वावलंबन मिळेल. खादी हे त्यांच्या आर्थिक समाजवादाचे प्रतीक होते. याच नाही तर अशा अनेक पैलूंमुळे ते आपले राष्ट्रपिता ठरले. गांधीजींनी 'रामराज्य' म्हणजेच न्याय आणि समानतेवर आधारित जो समाज कल्पिला होता, तो आजही आपले ध्येय आहे. त्यांचा समाजवाद हा केवळ सत्तापालट नसून, तो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील परिवर्तन आहे. मला जेवढे माहीत आहे त्यानुसार समाजवाद एक सुंदर शब्द आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या विचारांची सुंदरता जपण्यासाठी, आज आपल्याला केवळ त्यांची पूजा न करता, त्यांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे. गांधींचा विचार आजही आपल्याला हाच प्रश्न विचारतो:आपण खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान असा भारत निर्माण करण्यासाठी तयार आहोत का?