विजयादशमी : विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध

विजयादशमी म्हणजेच दसरा हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत तेजस्वी, प्रेरणादायी आणि भक्तिमय सण. प्रत्येक वर्षी आश्विन शुद्ध दशमीला साजरा होणारा हा दिवस केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनालाही मोठा संदेश देणारा आहे. विजयादशमीचा अर्थच असा की सततचा संघर्ष, धैर्य आणि संयम यांच्या साहाय्याने प्राप्त होणारा विजय.दसर्याच्या दिवशी श्रीरामाने अन्याय, अधर्म व क्रौर्य याचे प्रतीक असणाऱ्या रावणाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय संपादन केला. म्हणून या दिवसाला "सत्याचा असत्यावर विजय" असा अर्थ लाभतो. याच दिवशी पांडवांनी वनवासानंतर आपली अस्त्रं शमीच्या झाडातून बाहेर काढून विजय मिळविला, अशी परंपरा सांगितली जाते. महाराष्ट्रात दसर्याच्या दिवशी शमीपूजन, अपराजितेची पूजा आणि "सोनं म्हणजे शमीची पाने" वाटण्याची प्रथा ही त्या गौरवगाथेला स्मरते.दसर्याच्या काळात नाट्यप्रयोग, जत्रा, शस्त्रपूजन, रथोत्सव, मराठी सामूहिक परंपरा आजही जतन झालेल्या आहेत. हा दिवस प्रत्येकाला कर्तव्यपूर्तीचे स्मरण करून देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, परिश्रम व प्रामाणिकपणाने विजय मिळतो, हा संदेश दसरा सांगतो.माणसांमध्ये "सोने वाटणे" ही केवळ परंपरा नसून माणुसकीची ऊब वाढविण्याचा एक सुंदर संस्कार आहे.आजचा काळ वेगवान, विज्ञानप्रधान आणि स्पर्धेने भरलेला आहे. अशा युगात दसऱ्याचा संदेश अधिकच प्रभावी ठरतो. आधुनिक समाजात खरी लढाई ही बाह्य शत्रूशी इतकी नसून आतल्या भीती, स्वार्थ, लोभ, भ्रष्टाचार, अज्ञान आणि अनास्था यांच्याशी आहे.आज प्रत्येक तंत्रज्ञानाच्या, आर्थिक प्रगतीच्या टप्प्यावर उभा राहून माणूस आतल्या अनिष्ट प्रवृत्ती ओलांडल्याशिवाय खरा विजय मिळवू शकत नाही. दसर्याचा दिवस आपणा सर्वांना हेच स्मरण करून देतो की घरात, समाजात आणि राष्ट्रात ऐक्याचा विजय व्हावा.सत्य, नैतिकता आणि माणुसकीच्या मार्गावर चालणे हेच शस्त्रपूजन आहे.लोभ लाचलुचपत, हिंसा, असमानता या आधुनिक 'रावणांना' संपवणे हेच खरी विजयादशमी आहे. दसर्याला आपण केवळ लालपिवळ्या पोशाखात, गोडधोड खाऊन, सोने वाटण्यात मर्यादित न ठेवता जीवनातील प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हृदयातील नकारात्मक प्रवृत्ती संपवून मानवतेचा विजय मिळविला, की तोच खरा दसरा!म्हणूनच विजयादशमी फक्त एक सण नाही, तर सद्गुणांचा जयघोष, अधर्माचा पराभव आणि आत्मविश्वासाचा सोहळा आहे. आजच्या नव्या युगातील प्रत्येक युवक-युवतीने या दिवसातील संदेश आत्मसात केला, तरच समाजातील प्रगती खरी ठरेल.