कणकवली येथील कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा सत्कार

कणकवली येथील कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा सत्कार

 

कणकवली
 

       कलमठ ग्रामपंचायत म्हणजे आदर्श ग्रामपंचायत कशी असावी याचा वस्तुपाठ आहे, असे गौरवोद्गार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठीच्या सुविधा, आणि नवोपक्रमांमुळे मी भारावून गेलो आहे. याठिकाणी भेट देऊन मला समाधान मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा त्यांनी विशेष सत्कार केला.डॉ. सुर्यवंशी यांनी महसूल दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी सत्यपान अॅपद्वारे हयात प्रमाणपत्रांचे वाटप, विविध दाखल्यांचे वितरण आणि ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचे निरीक्षण करण्यात आले. सरपंच संदीप मेस्त्री यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि वृक्ष देऊन स्वागत केले.डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, मी कुठल्याही ग्रामपंचायतीत गेलो की, सर्वप्रथम कचऱ्याचे नियोजन विचारतो. ग्रामपंचायत जर कचऱ्यावर उपाययोजना करत नसेल, तर ती पंचायत इतर काही करू शकत नाही. कलमठ ग्रामपंचायतीने सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण, त्याचे संकलन, प्रक्रिया युनिट बसवणे, आणि घरोघरी कचरा गोळा करण्याची यंत्रणा उभी करून उत्तम कार्य केले आहे. याखेरीज गावातील प्रत्येक महिलेस दरमहा पाच सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे. ही बाब इतर गावांसाठीही प्रेरणादायक ठरावी, असे आयुक्तांनी सांगितले.सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत प्रथम क्रमांक, ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन, शाळांसाठी सीसीटीव्ही, वॉटर एटीएम यांसारख्या सुविधा, गावातील भूमिहीन कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्याचा उपक्रम, महाऑनलाईन 'आपले सरकार' पोर्टलच्या माध्यमातून गावातच विविध प्रमाणपत्रांची सोय आदींबाबतची माहिती दिली.या कार्यक्रमाला अप्पर आयुक्त डॉ. मानिक दिवे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी अधिकारी तसेच सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी सरपंच महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.