भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन. खासदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश.

मुंबई.
जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. बदला म्हणून नाही तर बदल म्हणून मी हे राजकारण करत आहे असं सांगत त्यांनी आपण कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगितलं. तसंच पण बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं असं सांगात भाजपावर टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी यानिमित्ताने भाजपावर निशाणा साधत वापरुन फेकून द्या अशी त्यांची वृत्ती असल्याची टीका केली. तसंच विकासाच्या वाटेत येणाऱ्यांची वाट लावून दिल्लीत पोहोचू असा निर्धार व्यक्त केला.
"जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मषे पाटील आज शिवसेनेच्या कुटुंबात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पण निष्ठावंतांच्या नशिबी संघर्ष असतो. शिवसेनेत कदर असल्याने ते आले आहेत. त्यांच्या येण्याने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ मिळेल. संघर्षाच्या काळात त्यांच्यासारखा नेता उद्धव ठाकरेंसह उभा राहिला याबद्दल अभिनंदन करतो," असं संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवसेनेतील प्रवेशाने जळगावमधील निवडणूक फक्त रंगतदार नाही, तर विजयाकडे घेऊन जाणारी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.