राधा जन्माष्टमी......राधेचा प्रेमळ उत्सव, जिथे भक्ती आणि प्रेम एकत्र येतात

व्रजभूमीत जन्मली एक भक्तीची मूर्ती,
प्रेमरूपी गाण्याची ती सुरेल ज्योती…
कृष्णाच्या नावाने दंग तिचे राधेचा श्वास कृष्णात विलीन,
कृष्णाची ओढ राधेच्या नयनीन,
प्रेम जिथे नव्हते अट-शर्त, नव्हती सीमा,
तेथे घडली कृष्ण-राधेची केवळ ‘प्रेमाची गीता’ जीवन,
विश्वभर पसरले राधे कृष्णाचे दैवी चिंतन.
राधा जन्मोत्सव, जो राधा अष्टमी म्हणूनही ओळखला जातो, या दिवशी राधा-कृष्ण मंदिरात विशेष पूजा व भजन आयोजित केले जातात. वृंदावनातील मंद झुळूक जशी मुरलीच्या सुरांशी बोलते, तशीच भक्ताच्या अंतःकरणातील भावना राधा नामस्मरणाने गंधीत होत जाते. राधेचे नाव घेतले की कान्हाचे स्मरण अनिवार्यच ठरते, कारण जसे चंद्र आणि चांदण्यात कधीच फरक होत नाही, तसेच कृष्णाशिवाय राधा आणि राधेशिवाय कृष्ण अशी कल्पनाच अशक्य.पौराणिक वाङ्मयाच्या सुवर्णपानांत एक अशी दिव्य संध्या आहे, जिथे भक्ती आणि प्रेम एकरूप झालेले दिसते. ती म्हणजे राधेचा जन्मोत्सव. जसे श्रीकृष्णाचे नाम घेताच हृदय नाचते, तसेच "राधा" या नावाने आत्मा मंतरलेला भासतो. कारण कृष्णाविना राधा अशक्य, आणि राधाविना कृष्ण अपूर्ण. एका डोळ्यासमोर दिव्य प्रेमाचे, निर्मळ भक्तीचे आणि आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचे दर्शन घडवणारा दिवस म्हणजेच राधा जन्माष्टमी.ती केवळ व्रजभूमीतील एक साधी ग्वालिनी नव्हती, तर भक्तीची मूर्तिमंत देवी होती. तिच्या डोळ्यांत एकाग्रतेची अखंड आग होती, हृदयात कृष्णासाठी निखळ समर्पण होते. जगातील सर्व सांसारिक बंधनांवर मात करून ती "प्रेम" या एकाच धर्मात लीन झाली. म्हणूनच राधा ही केवळ इतिहासातील व्यक्तिरेखा नाही, तर ती एक भावना आहे, एक अनुभूती आहे . जी प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात दडलेली आहे.कृष्ण-राधेचे प्रेम हे केवळ सांसारिक नव्हते; ते आत्मा आणि परमात्मा यांच्या संगमाचे प्रतीक होते. राधेच्या ओढीशिवाय कृष्णाचा स्वर अधुरा आहे, आणि कृष्णाच्या वंशीशिवाय राधेच्या भावनेची पूर्ती नाही. म्हणूनच संपूर्ण विश्वात "राधे कृष्ण" हे नाव कधीही वेगळे उच्चारले जात नाही, दोन्ही नावे जणू एकमेकांत विरघळलेली.या दिवशी राधा अवतरली, जेणेकरून मानवजातीला समजावे प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नव्हे, तर संपूर्ण समर्पण होय. भक्ती म्हणजे केवळ विधी नव्हे, तर आत्म्याचा स्वच्छ श्वास आहे. या दिवसाचे स्मरण म्हणजे आपल्या अंतःकरणातील "शुद्धतेचा वसा" जागृत करणे.या पवित्र दिवशी व्रजभूमीत मंदिरांमध्ये, वृंदावनात आणि प्रत्येक भक्तांच्या हृदयात प्रेमाचा महोत्सव खुलतो. आरत्या, कीर्तन, भजनांतून "राधे राधे"चा निनाद संपूर्ण विश्व हलवून टाकतो.राधेच नाव घेताच जसा भक्ताचा जीव कृष्णाशी एकरूप होतो, तशीच ही तिथी आपल्याला अंतःकरणातील दिव्य प्रेमाची अनुभूती घडवते.