सावंतवाडी शहरात गव्यांचे दर्शन
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील भर वस्तीत आज पहाटे रानगव्यांच्या कळपाने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरोडा नाका येथील वृंदावन सोसायटी परिसरात पहाटे साडेतीन ते सहा वाजेपर्यंत पाच गव्यांचा कळप मुक्तपणे वावरत होता. भर वस्तीत गव्यांचे दर्शन झाल्याची ही अलीकडच्या काळातील मोठी घटना मानली जात आहे.
पहाटेच्या सुमारास जेव्हा शहरात शांतता होती, तेव्हा या पाच गव्यांच्या कळपाने शिरोडा नाका परिसरात प्रवेश केला. पहाटे सहा वाजेपर्यंत हा कळप वृंदावन सोसायटीच्या आसपासच्या परिसरात फिरत होता. मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि काही रहिवाशांना हे गवे दिसल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या काळात गव्यांनी कोणावरही हल्ला केला नाही किंवा मालमत्तेचे नुकसान केले नाही. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात गव्यांचा वावर वाढला आहे, मात्र आता हे गवे थेट सावंतवाडी शहराच्या मुख्य वस्तीत दिसू लागलेत. सकाळी सहा वाजेनंतर हा कळप नैसर्गिक अधिवासाकडे निघून गेला असला, तरी या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीती कायम आहे. वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा आणि शहरात त्यांचा शिरकाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

konkansamwad 
