फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेस शैक्षणिक भेट

फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेस शैक्षणिक भेट

 

फोंडाघाट

 

  फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सहलीअंतर्गत वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेस भेट दिली. या अभ्यासपूर्ण भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्र, मच्छीमारांची अर्थव्यवस्था तसेच संस्थात्मक कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता. यावेळी फोंडाघाट महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये या शैक्षणिक सहलीचा उद्देश व महत्त्व विशद करत, अभ्यासक्रमासोबत प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक दृष्टिकोन अधिक व्यापक होतो, असे नमूद केले.या कार्यक्रमास वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन सागर म्हाकले, व्हाइस चेअरमन आनंद वेंगुर्लेकर, संचालक वसंत तांडेल, विनायक केळुसकर, महेश मोर्जे, मनोहर तांडेल, संचालिका सौ. आयेशा हुले, सीमा पराडकर, सचिव हितेंद्र रेडकर तसेच संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, सभासद संख्या, सभासदांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा व सुविधा, विविध प्रकारची मासेमारी, मासे विक्री व्यवस्थापन, फिश ऑइल प्रक्रिया, तसेच परप्रांतीय एलईडी नौकांमुळे स्थानिक मच्छीमारांना होणारे नुकसान आणि मच्छीमारांसमोरील विविध आर्थिक व सामाजिक समस्या याबाबत सविस्तर माहिती दिली.
      यावेळी तेजस निगुडकर, ओंकार गुरव, सिद्धेश जोईल, त्रिविवेक शिंदे, विवेक पेडणेकर, सोनल येंडे, साहिल जाधव, पियुषा जाधव या विद्यार्थ्यांनी संचालक मंडळाशी संवाद साधत विविध प्रश्न विचारून मोलाची माहिती जाणून घेतली. वेंगुर्ला मच्छीमार सहकारी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल फोंडाघाट महाविद्यालयाच्या वतीने संचालक मंडळ व सभासदांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राज ताडेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.