वेंगुर्ला-उभादांडा येथे अवैध गांजा जप्त.....एकाला अटक

वेंगुर्ला
वेंगुर्ले येथील उभादांडा-बागायतवाडी येथे अवैध गांजा विक्री करताना एकाला पकडण्यात आले आहे.३६६ ग्रॅम गांजा सदृश्य अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आरोपी प्रसाद प्रकाश तुळसकर(32) रा. उभादांडा, बागायतवाडी याला गांजासह वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ०४ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता करण्यात आली. आरोपी प्रसाद यांच्या घरावर छापा टाकून गांजा जप्त करण्यात आला असून उभादांडा बागायतवाडी येथील कोठारेश्वर मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर प्रसादला पकडण्यात आले. या कारवाईमुळे उभादांडा परिसात मोठे गांजा विक्रीचे रॅकेट अस्तित्वात आहे अशी चर्चा स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.उभादांडा सारख्या ग्रामीण भागात गांजा सापडल्याने सदर गांजा सदृश्य अमली पदार्थ या भागात आला कसा? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. उभादांडाखेरीज वेंगुर्ल्यात असे गांजा विक्रीचे अड्डे अजून कुठे आहेत याचा शोध पोलीस घेत असून वेंगुर्ला तालुक्यात गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची साशंकतादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार योगेश सराफदार, योगेश राऊळ, चालक जोसेफ, पोलीस नाईक, स्वप्निल तांबे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी तामानेकर, होमगार्ड धुरी, गिरप यांनी केली.