तिलारी खोऱ्यातील तेरवण-मेढे परिसरात सापडली बकऱ्यांची पाच कापलेली मुंडकी
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील तेरवण-मेढे परिसरात एका अघोरी कृत्य घडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. उन्नैयी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर बकऱ्यांची पाच कापलेली मुंडकी, नारळ आणि सुपारी सापडल्याने हा 'भानामती' किंवा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी असे प्रकार निवडणूक कालावधीत घडले होते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर होताच हा प्रकार घडल्याने परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. तेरवण-मेढे उन्नैयी बंधारा आणि तिलारी धरण हे पर्यटकांचे आवडते केंद्र आहे. याच मार्गावर नदीपात्राजवळ अज्ञात व्यक्तींनी पाच बकऱ्यांचा बळी दिला. घटनास्थळी बकऱ्यांची पाच मुंडकी, आठ नारळ, पानांचे तीन ढीग आणि त्यावर सुपारी मांडलेली अवस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे, बकऱ्यांची मुंडकी तेथेच टाकून धड मात्र गायब करण्यात आले आहेत. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीसह संतापाची लाट उसळली आहे.
या भागात शालेय सहली, शिक्षक आणि पर्यटक पोहण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. अशा सार्वजनिक आणि निसर्गरम्य ठिकाणी अशा प्रकारचे 'अघोरी' कृत्य केल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजात एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधन सुरू असताना, दुसरीकडे अशा विकृत प्रवृत्तींकडून अघोरी कृत्यांना खतपाणी घातले जात आहे.

konkansamwad 
