'नंदाच्या अंगणात गोकुळाचा नाथ आला…गोपाळाच्या हास्यातून विश्वाला नवी दिशा मिळाली…'

'नंदाच्या अंगणात गोकुळाचा नाथ आला…गोपाळाच्या हास्यातून विश्वाला नवी दिशा मिळाली…'

 

    आषाढ-श्रावणाच्या पावसांत न्हाऊन निघालेली धरणी जेव्हा हिरव्यागार शालूने नटते, त्या दिवसांत भक्तांच्या मनात एक आगळाच उत्साह असतो. रात्रीचा अंधार मिटवणारी मध्यरात्रीची ती क्षणभराची घंटानादात मिसळलेली हळुवार बासरीची गोड लय–हाच तो क्षण जेव्हा यशोदेच्या ओटीत गोकुळाचा मोहन जन्म घेतो. दुष्टाचा नाश आणि सज्जनांचा रक्षणकर्ता म्हणून जेव्हा नारायणाने मानवी रूप घेतले, तेव्हा गोकुळाच्या प्रत्येक हृदयात आनंदोत्सव साजरा झाला. ही केवळ एक जन्मकथा नव्हे, तर भक्ती, धर्म आणि प्रेमाचे अधिष्ठान आहे.कंसाच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या जनतेला जेव्हा वासुदेवांनी यशोदा-नंदाच्या घरी गुपचुप कृष्णाला आणून ठेवले, तेव्हा गोकुळात नव्या उमंगाची पहाट झाली. छोटासा कृष्ण गायींच्या सावलीत खेळू लागला, माखनचोर बनूनही सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू लागला. त्याची नटखट नजर, ती पापण्या लपकवणारी स्मितरेखा आणि बासरीचा मधुर नाद, हाच तर सर्वोच्च आनंदाचा अनुभव होता. कृष्ण केवळ देव नव्हता, तो मित्र, मार्गदर्शक, प्रेमळ पुत्र आणि रक्षणकर्ता होता. त्याच्या जीवनकथेतून आपल्याला मिळणारा मोठा संदेश म्हणजे "धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर नीतिमूल्यांचे पालन आणि सच्च्या मनाने केलेली सेवा".
  गीतेत कृष्णाने सांगितले, "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच आपल्या जीवनाचे कर्तव्य आहे.गोकुळातील प्रत्येकाशी कृष्णाचे प्रेम समान होते, जातीपातींच्या पलीकडे जाऊन. कृष्णाच्या खेळात, गायीच्या सान्निध्यात आणि साध्या बासरीत अनंत आनंद होता.जीवन कितीही गुंतागुंतीचे असले तरी, आपले कार्य प्रामाणिकपणे करणे हेच खरे भक्तीच रूप आहे. कृष्ण जन्माष्टमी हा केवळ उत्सव नाही, तर जीवनाला दिशा देणारा अध्याय आहे. तो शिकवतो की प्रेम, सत्य आणि धर्म हीच आपली खरी संपदा आहे. गोकुळाचा बासरीवाला आजही प्रत्येक हृदयात फुंकर घालतो आहे फक्त आपण त्या स्वराला ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे.जन्माष्टमीला आपल्या अंतःकरणातला लोभ, अहंकार आणि द्वेष दूर करून, बासरीच्या गोड स्वरांसारखे प्रेम आणि शांतता पसरवूया.